‘चोर रस्त्यात सापडले तर लोक कपडे काढून मारतात, धनुष्यबाणाच्या चोरांनाही…’, संजय राऊत यांचं मोठं विधान

| Updated on: Feb 18, 2023 | 7:21 PM

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कोकण दौऱ्यावरुन मुंबईत परतल्यानंतर त्यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याविषयी राऊतांनी माहिती दिली.

चोर रस्त्यात सापडले तर लोक कपडे काढून मारतात, धनुष्यबाणाच्या चोरांनाही..., संजय राऊत यांचं मोठं विधान
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कोकण दौऱ्यावरुन मुंबईत परतल्यानंतर त्यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. राऊतांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय राऊत ‘मातोश्री’बाहेर आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीत काय चर्चा झाली, याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी अतिशय मोठं विधान केलं.

“कुणीही जाणार नाही. आम्ही सगळे फक्त धनुष्यबाण जे चोरणारे लोकं आहेत त्यांच्या तपासाला लागलेलो आहोत. ही चोरी त्यांना महाग पडेल. चोरांना अनेक ठिकाणी रस्त्यात पकडून मारलं जातं. चोर हातात सापडला तर त्यांना रस्त्यावर लोकं कपडे काढून मारतात. धनुष्यबाणाच्या चोरांनासुद्धा अशाप्रकारे राज्याची जनता रसत्यावर पकडून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं.

“मी कोकणच्या दौऱ्यावरुन आलोय. आम्ही आता चर्चा केली. शिवसेनेच्या धनुष्यबाणाची चोरी झालीय. ते चोर कोण आहेत? अलिकडच्या काळात महाराष्ट्रात मंदिरांवर दरोडे पडत आहेत. मंदिरांचे सोन्याचे कळस चोरी होत आहे. मूर्त्या चोरीला जात आहेत. त्याचपद्धतीने आमच्या मंदिरातला शिवसेनाप्रमुखांचा धनुष्यबाण चोरीला गेला”, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“या चोरीसाठी दिल्लीतल्या एखाद्या महाशक्तीने काय मदती केली याचा आम्ही तपास करतोय. पण लोकांना आम्ही सांगू इच्छितो की, धनुष्यबाणाची चोरी झालेली असून संशयित चोर कोण आहे याबद्दल लवकरच माहिती देऊ”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘धनुष्यबाण चोरणाऱ्यांचं वस्त्रहरण करणार’

“आमच्या धनुष्यबाणाची चोरी झालीय. या चोरीत कोण-कोण सामील आहे, दिल्लीतले बडे लोक कोण आहेत, इथले कोण आहेत, त्याबद्दल आम्ही तपास करु. तसेच चोरांबद्दलची माहिती आम्ही जनतेलासुद्धा देऊ. धनुष्यबाण चोरणारे, पक्षावर दरोडा टाकणारे कोण आहेत? चोरांचे सरदार कोण आहेत? याबद्दल लवकरच खुलासा करु. आता दुसऱ्या चिन्हाबद्दल चर्चा सुरु आहे. ती होऊन जाईल. पण त्याआधी धनुष्यबाण चोरणाऱ्यांचं वस्त्रहरण करु”, असं राऊत यावेळी म्हणाले.

“आमचं धनुष्यबाण चोरीला गेलंय आणि भाजपचे लोक आनंद व्यक्त करत आहेत. हे काय आहे? भाजपला बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा घेऊन नाचावं लागतं आहे. हे लोक कालपर्यंत बोलत होते की शिवसेना मोदीजींचा फोटो लाऊन मतं मागत होती. पण आता तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचा मुखवटा लावून इथे मतं मागायची वेळ आलीय, हे विसरु नका. त्यासाठीच तुम्ही आमच्या धनुष्यबाणाची चोरी केलीय”, असा घणाघात त्यांनी केला.

“व्हीप वगैरे या तांत्रिक गोष्टी आहेत. या मुद्द्यावरुन तुम्ही चर्चा करण्याची गरज नाही. तुम्ही यावरुन उगाच डोकंफोड करुन घेऊ नका. याला वेळ आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“आमदार खासदार त्यांच्याबरोबर जे गेले आहेत ते जाऊद्याना. पण आज दिवसभरात पाहिलं असेल, इथे उद्धव ठाकरे यांना शेवटी गाडीच्या टपावर बसून भाषण करावं लागलं आणि लोकांना ते बाळासाहेब आठवले की, ज्या बाळासाहेबांनी त्या काळात 50 वर्षांपूर्वी लोकांना संबोधित करण्यासाठी गाडीच्या टपावर उभं राहून भाषण करावं लागलं”, असं देखील ते यावेळी म्हणाले.