राज्यातील राजकारणात दोन वर्षांपूर्वी भूंकप झाला होता. शिवसेनेत फूट पडली होती. शिवसेनेतील बहुतांशी आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचे म्हटले. या निर्णयांविरोधात शिवसेना उबाठाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाकडून अजूनही निर्णय होत नाही. त्यामुळे आम्ही जनतेच्या न्यायालयात जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठाचे गीत लॉन्च करुन विधानसभेची रणशिंग फुंकले.
गाणं ऐकल्यावर काय बोलायचं. गेली दोन अडीच वर्ष आम्ही न्याय मंदिराची दारे ठोठावत आहोत. न्याय देवतेवर विश्वास आहे. न्याय मिळत नाही. म्हणून जगदंबेलाचा साकडे घातले तू तरी दार उघड, असे म्हणत आम्ही जनतेच्या न्यायालयात जात आहोत. राज्यात तोतयेगिरी सुरू आहे. महिलांवर अत्याचार सुरू आहे. घटनाबाह्य सरकार आहे. मला खात्री आहेच की मनापासून जगदंबेला हाक मारल्यावर ती धावून येतेच. आम्हाला त्यांच्याकडून न्याय मिळेल.
हे गाणं आपल्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा. आपण माध्यमे अन् सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यात हे गाणे पोहचवू. दसऱ्याला आपण भेटणार आहोतच. पण जनतेच्या दरबारात ही लढाई सुरू झाली आहे. राज्यात सध्या अराजक माजलं आहे. त्यामुळे आम्ही अराजकीय गाणं आणलं आहे. दसऱ्याला सर्व गोष्टींचा फडशा पाडणार आहोत. आता सणासुदीचे दिवस आहेत. कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून गाण्याच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. ज्यांना बोलायचं ते बोलू द्या. नंतर सो सुनार की एक लोहार की.. होईलच
मशाल हाती दे म्हटलंय. आम्ही जगदंबेला म्हटलं आई दार उघड. तुझी मशाल माझ्या हाती दे म्हटलं आहे. ज्या महिला आहेत. त्यांना माता रणरागिणीच्या रुपात मानतो. त्यांच्या हातात मशाल दे. त्यांच्यात तू आवतार घे. त्यांच्यात तेज दे. जे अराजक आहे. ते जाळून भस्म कर.