Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आली आहे. दहा मोबाईल कॅमेरे लावून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. यासंदर्भात विधिमंडळातही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. रेकी करणारी गाडी उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील असण्याची शक्यता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
खासदार संजय राऊत मैत्री या बंगल्याची दोन अज्ञात इसमांकडून रेकी करण्यात आली. संजय राऊत यांच्या घराच्या सीसीटीव्हीमधून हा प्रकार उघड झाला. ते संजय राऊत यांच्या बंगल्याचे फोटो काढतात. त्यानंतर ते निघून जातात. हे दोन जण रेकी करत असताना संजय राऊत यांच्या घरी कोणीच नव्हते.
संजय राऊत रोज सकाळी ९.३० वाजता माध्यमांशी संवाद साधतात. त्यापूर्वी संजय राऊत यांच्या घराची रेकी दोन बाईकस्वारांनी केली. त्यांनी दहा मोबाईल कॅमेरे लावून रेकी केली. ही माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींना समजल्यावर त्यांना रोखले. त्यानंतर ते बाईकस्वार पळून गेले. दरम्यान संजय राऊत यांच्या निवासस्थानी रेकी झाल्याचा प्रश्न विधिमंडळात भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांना महाविकास आघाडी सरकार असताना वाय प्लस सुरक्षा होती. त्यानंतर महायुती सरकार आल्यावर ही सुरक्षा काढली. आता संजय राऊत यांना साधी सुरक्षा आहे. संजय राऊत यांनी सांगितले की, यापूर्वी मला धमकीचे फोन आले होते. तसेच रेकी करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत म्हणाले, रेकी केली त्यावेळी घरात कोणीच नव्हते. परंतु रेकी करणारी दुचाकी ही उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील असू शकते. तसे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.