महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या दोन महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार घडामोडी सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकीत सुरुवातीला मुंबईतील जागांबाबत निर्णय घेतला जात होता. या बैठकीत प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळा दावा केला जात होता. मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. या जागांपैकी ठाकरे गट 20 ते 22 जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या संभाव्य 22 उमेदवारांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाची मुंबईत 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरु आहे. टीव्ही 9 मराठीकडे ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादीच हाती लागली आहे. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित यादी संभाव्य आहे. या यादीत विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तसेच नवीन तरुणांनादेखील या यादीत संधी दिली जाताना दिसत आहे. तरुणांना संधी दिलीच पाहिजे आणि जुने जाणते लोकं त्यामध्ये असणं जरुरीचं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने गेल्या विधानसभा निवडणुकीत 14 जागांवर विजय मिळवला होता. मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे तीन जागा जिंकल्या होत्या. तर चौथ्या जागेवर निसटता पराभव झाला होता. त्यामुळे ठाकरेंचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक ही ठाकरे गटासाठी जास्त महत्त्वाची आहे.