मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्या ठाकरे गटाचा ठाण्यात उत्तर भारतीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा उद्या पार पडणार होता. पण हा मेळावा तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये हा मेळावा उद्या आयोजित करण्यात येणार होता. पण तो आता रद्द करण्यात आला आहे. रायगडच्या खालापूर येथे इर्शाळवाडी गावावर दरड कोसळळ्यामुळे मोठी जीवितहानी झालीय. या दुर्घटनेमुळे ठाकरे गटाचा उत्तर भारतीय मेळावा तूर्तास रद्द करण्यात आला आहे.
हा मेळावा कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. पण सध्या इर्शाळवाडीच्या घटनेचं गांभीर्य ओळखून हा मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. इर्शाळवाडी गावावर मोठं संकट कोसळलं आहे. या संकटात अनेकांचा मृत्यू झालाय. एनडीआरएफच्या जवानांकडून अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य सुन्न झालं आहे.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणारा उत्तर भारतीय मेळावा तूर्तास रद्द करण्यात आला आहे. हा मेळावा आता पुढच्या आठवड्यात होईल, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे उद्या इर्शाळवाडी गावाला भेट देणार आहेत. ते पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत. इर्शाळवाडीतील दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेतील मृतकांची संख्या वाढण्याची भीती आहे. तर प्रशासनाकडून दिवस-रात्र घटनास्थळी काम सुरु आहे.
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याच रात्री ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे मदतीसाठी रवाना झाले होते. त्यानंतर पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेनंतर आता जेजुरी येथे 23 जुलैला होणारा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. इर्शाळवाडीतील घटनेमुळे आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट असल्यामुळे कार्यक्रम तात्पुरता रद्द करण्यात आलाय.
यापूर्वी 13 जुलैला निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यावेळीही कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. यासंदर्भात नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील घटनास्थळा भेट दिली आहे.