ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे मागितला खर्च, आकडा किती होतो माहिती आहे का?

| Updated on: Jan 16, 2024 | 8:51 PM

उद्धव ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांवरील स्टॅम्पचा खर्च सांगितला. त्यांनी निवडणूक आयोगाकडे या स्टॅम्पचा आलेला खर्च परत करण्याचं आवाहन केलं. पण त्यांनी सांगितलेला स्टॅम्पच्या खर्चाचा आकडा हा खूप मोठा आहे.

ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे मागितला खर्च, आकडा किती होतो माहिती आहे का?
Follow us on

मुंबई | 16 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. विधानसभा अध्यक्षांनी 10 जानेवारीला आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. या निकालात ठाकरे गटाचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद आयोजित करत विधानसभा अध्यक्षांचा निकाल कसा चुकीचा होता? हे सांगण्याचा प्रयत्न केला. यासाठी वकील असीम सरोदे यांनी आधी विश्लेषण केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रांचा झालेला खर्चच परत मागितला. पण ठाकरेंनी सांगितलेला खर्चाचा आकडा खरंच खूप मोठा आहे.

“निवडणूक आयोगावर केस केली पाहिजे. १९ लाख ४१ हजार शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र पुरवली होती. निवडणूक आयोग काय त्यावर गाद्या करून झोपलंय का? एक तर ते स्वीकारा आमचा हक्क आम्हाला द्या. १९ लाख ४१ हजार इनटू शंभर रुपये केलेला खर्च आम्हाला परत द्या. हा मोठा घोटाळा आहे. शिवसैनिकांचे पैसे गेले आहेत. ते काही दोन नंबरचे नाही. ईडी त्यांचे नोकर आहे”, असं उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

“उघड बोलतो. काय करणार आहेत. बघून घ्याल तुम्ही. मला काय चिंता. मी मुद्दाम पीसी घेतली. २०१८ रोजी इथेच शेवटची निवडणूक झाली होती. २०१३ मध्ये कोण कोण होते पाहिले. राम राम गंगारामही होते त्यात”, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानुसार प्रतिज्ञापत्रांवर एकूण किती खर्च झाला?

उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितल्यानुसार त्यांच्या पक्षाकडून शिवसैनिकांचे तब्बल 19 लाख 41 हजार शपथपत्र निवडणूक आयोगात पाठवण्यात आली होती. या प्रत्येक प्रतिज्ञापत्रावर 100 रुपयांचा स्टॅम्पचा खर्चाचा हिशोब केला तर 19 लाख 41 हजार गुणिले 100 असा हिशोब करावा लागले आणि त्याची एकूण किंमत 19 कोटी 41 लाख इतकी होते. उद्धव ठाकरेंनी खर्चाचा आकडा सांगितला नाही. पण त्यांनी सांगितल्यानुसार हिशोब केला तर हा आकडा दिसतो. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यावर पुढे निवडणूक आयोगात काही टीप्पणी करतं का? किंवा याबाबत काही राजकीय टीका-टीप्पणी होते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.