गणेश थोरात, ठाणे | 17 नोव्हेंबर 2023 : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला दोन शिवसेनेतील वाद उफळून आला. दोन गटाचे शिवसैनिक गुरुवारी रात्री एकमेकांच्या विरोधात भिडले. ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंतिम संस्कार झाले त्याच ठिकाणी शिवसैनिक एकमेकांविरोधात भिडले. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे स्मृती स्थळाजवळ लावले रॉड पडले, बॅरिकेड्सही पडले. गुरुवारच्या या वादानंतर आता ठाणे बॅनरबाजीमधून वाद निर्माण केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे आणि ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला बॅनरच्या माध्यमातून खोचक टोला लगावला आहे.
17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाण्यातील तीन हात नाका परिसरात शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी बॅनर लावले. दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील बॅनर लावले गेले आहे. त्या बॅनरच्या माध्यमातून शिंदे गटला टार्गेट केले गेले आहे.
तू लढला नाहीस तरी चालेल परंतु तू विकला जाऊ नकोस तू विकला गेलास तर समाज कमजोर होईल, असा आशय असलेला मजकूर लिहिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खोचक टोला लगवणारा हा मजकूर या बॅनरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईतून सुरु झालेला हा वाद ठाण्यात पोहचणार आहे. आता ठाण्यात येणाऱ्या काळात शिंदे आणि ठाकरे गट हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटातील वाद लक्षात घेऊन ठाण्यात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठाण्यात दोन्ही गटाकडून देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. आता ठाण्यात पोलिसांची कसोटी लागणार आहे.