मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाकडून ताकद द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या बारामतीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी खडकवासला मतदारसंघ आपल्याकडे घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निसास्थानी आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मावळ, शिरुर, पुणे, बारामती मतदारसंघांचा आढावा घेतला. तयारीला लागा, निवडणुका कधीही लागतील आणि आम्ही जो उमेदवार देवू तो निवडून आणा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी बैठकीत दिल्या.
आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांकडून याबाबत सातत्याने तशीच माहिती देण्यात येत आहे. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी ठाकरे गट तयारीला लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट आणि भाजपच्या युतीच्या उमेदवाराच्या पराभवासाठी महाविकास आघाडीचे तीनही पक्ष बारामतीत ताकद लावण्याची शक्यता आहे.
बारामती मतदारसंघ हा शरद पवार यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण तो त्यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी तिथे निवडून येणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं मानलं जात आहे. असं असताना बारामतीचे नागरीक कुणाला मतदान करतात ते आगामी काळात समोर येईल.