मुंबई: शिवसेना (shivsena) आणि मनसेमध्ये (mns) सध्या व्हिडीओ वॉर सुरू आहे. मनसेने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर हल्ला चढवला होता. भोंग्याविषयीची शिवसेनाप्रमुखांची भूमिका सांगणारा हा व्हिडीओ होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचा एक व्हिडीओ शेअर करून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे टीका करताना दिसत आहेत. राज ठाकरे यांच्या नेतृत्वापासून ते राज यांच्या भाषणाच्या स्टाईलवर शिवसेनाप्रमुख टीका करताना दिसत आहेत. मनसेची स्थापना झाल्यानंतर मराठीचा मुद्दा हाती घेण्यात आला होता. या मुद्द्यावरूनही शिवसेनाप्रमुख टीका करताना दिसत आहेत. अगदी काही मिनिटांच्या या व्हिडीओत मोजक्याच शब्दात बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंवर हल्लाबोल करताना दिसत आहेत.
या आमच्या पुतण्याने XX मारली. काय त्याच्या डोक्यात शिरलं माहीत नाही. नेतृत्व हे जे आहे ना (सभेतील गर्दीकडे बोट दाखवत), जे दिसतं ना ते पाहिजे. मैदान कसं भरलं होतं. एवढं झालं होतं का? हा फोटो माध्यमात नाही येणार. आमचाच येणार. हे दाखवा. हे दृश्य हे शिवस्वरूप. हे शिवाचं रुप आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणताना दिसत आहेत.
मी पूर्वी ज्या स्टाईलमध्ये बोलत होतो. अशी ही स्टाईल माझी कोणी तरी उचलली म्हणतात. मला माहीत नाही. कोणीतरी. म्हणजे मी माझ्या स्टाईलमध्ये बोललो तर मी त्यांची कॉपी करेल असं म्हणाल. एक विनोद आठवतो. परीक्षा चालू असताना एका मुलाने कोरा पेपर दिला. सोडवलाच नाही. कोरा पेपर. दुसऱ्या विद्यार्थ्याने तक्रार केली. सर सर…बघा त्याने कोरा कागद दिला. दिला… तुला काय झालं? नाही… तुम्ही माझ्यावर आरोप कराल. तुम्ही त्याची कॉपी केली म्हणून. स्टाईल वगैरे ठिक आहे हो… विचार… विचार महत्त्वाचे आहेत. काही वाचन वगैरे आहे का तुमचं अं… मराठी मराठी मराठी… अरे XXनो तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हा मी मराठी काढलीय या महाराष्ट्रामध्ये. ही साक्ष आहे त्याची. जाऊ द्या. खरं सांगायचं म्हणजे खूपच मुद्दे आहेत, असं बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसत आहेत.
राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून भोंग्याचा विषय हाती घेतला आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेने मनसेवर टीका सुरू केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेने बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करून उत्तर दिलं आहे. बाळासाहेबांचे भोंग्यावरील विधानाचे हे व्हिडिओ आहेत. त्यावर शिवसेनेने प्रत्युत्तर म्हणून हे व्हिडिओ व्हायरल केले आहेत.
शिवसेनेने पोस्ट केले बाळासाहेब ठाकरेंचे जुने व्हिडिओ… pic.twitter.com/OF3hrK9duN
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2022