मुंबई : नाणारमध्ये प्रकल्प होणार होता. त्याविरोधात आंदोलन झालं. त्यानंतर हा प्रकल्प बासनात गुंडाळला. त्यानंतर बारसूची जागा ठरवण्यात आली होती. ती ओसाड जमीन होती. उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतचा निर्णय घेतला होता. पण आज जर त्या प्रकल्पालाही बारसूतील जनतेचा विरोध असेल तर आम्ही जनतेच्या सोबत आहोत. लोक या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्यास तयार असतील तर पहिली गोळी शिवसेना छातीवर झेलेल, असं सांगतानाच हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जायेगी… आम्हाला शहाणपणा शिकवू नका; असा इशाराच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिला.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. लोकांचा विरोध असेल तर शिवसेना त्याला पाठिंबा देणार नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पर्यायी जागा सूचवली. तेव्हा हालचाली नव्हती. लोक आता पुढे आली असतील तर त्या पत्राला आमच्या दृष्टीने शून्य किंमत आहे. तो शासकीय कागद आहे. उद्दव ठकारे यांचंही ते म्हणणं आहे. कोणता तरी सरकारी कागद फडकवत उदय सामंत यांनी शहाणपणा करू नये. नाणारला जावं आणि लोकांशी बोलावं, असं संजय राऊत म्हणाले.
बारसूबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. नाणारला पर्याय देण्यासंदर्भात एक भूमिका नक्की घेतली. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. आम्ही उद्योगाचे शत्रू नाही. बाळासाहेबांनी रोजगार राहिला पाहिजे असं सांगितलं होतं. उद्योग आला तर रोजगार वाढेल ही भूमिका कायम आहे. पण एअर बस का बाहेर गेली? फॉस्कॉन वेदांत का बाहेर गेला? तो काय कोकणात होता का? वित्तीय केंद्र गुजरातला गेलं. ते काय कोकणात होतं का? त्यावर उद्योग मंत्र्यांनी तोंड उघडावं. हवा बहोत तेज चल रही है. टोपी उड जायेगी आपकी. ध्यान मे रखना, असा इशारा राऊत यांनी दिला.
राज्यात शिवसेनेला सुपाऱ्या घेण्याची गरज नाही. शिवसेना फोडण्याची सुपारी कोण घेत आहे? सुपाऱ्या घेऊन कोण काम करत आहे? हिंमत असेल तर समोर या. आम्ही फडणवीस बाबत संयमाने विधाने केली आहेत. आमच्या अंगावर आला तर लक्षात घ्या. कागदावर तुम्ही शिवसेना ट्रान्सफर केली असेल. पण लोकं आमच्यासोबत आहे. आम्ही लढू. आम्ही कोकणच्या जनतेसोबत आहोत. बारसूत जर लोकांना हा प्रकल्प नको असेल ते मरायला तयार असतील तर शिवसेना त्यांना मरू देणार नाही. पहिली गोळी शिवसेनेच्या छातीवर असेल, असा इशाराही त्यांनी दिला.