जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ही गर्जना करून बाळासाहेब सुरुवात करायचे. तेव्हा माझ्यासकट सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. ही आठवण सर्वांना आहे. गर्व से कहो हम हिंदू है ही सिंह गर्जना बाळासाहेबांनी देशाला दिली. पण काही लोकांना या शब्दाची अलर्जी झाली आहे. हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणताना काही लोकांची जीभ कचरू लागली आहे. पण आपल्याला हा शब्द उच्चारायला अभिमान वाटतो. पण हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना लाज वाटत आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली. त्यामुळे आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे, असा तडाखेबाज सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याची केली. आझाद मैदानावर शिवसेनाचा दसरा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
लपून बसलेला हा मुख्यमंत्री नाही. तर लोकांच्या कल्याणसाठी रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब म्हणाले होते, अन्याय सहन करू नका. जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. आम्ही उठाव केला नसता तर शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं. सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता. महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. महाविकास आघाडी असताना सरकार तिसऱ्या नंबरवर होतं. सहा महिन्यात आपण पहिल्या नंबरवर राज्य आणलं. होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी, अशी टोलेबाजी दाढीवरील टीकेवरुन एकनाथ शिंदेंकडून यांनी यावेळी केली.
चारही बाजूने लोक येत आहे. शेवटच्या टोकापर्यंत हा महासागर पसरला आहे. भगवा उत्साह संचारला आहे. महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं. तेव्हा काही लोक म्हणत होते हे सरकार १५ दिवस टिकणार नाही. एका महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरुन उरला आणि जनतेच्या आशीर्वादाने साथीने घासून नाही घासून पुसून नाही, ठासून दोन वर्ष पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा चेला आहे. असा स्वस्तात जाणार नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही. पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदान सोडत नाही.