मुंबई : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईच्या वॉक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ते दाखल झाले आहेत. प्रकाश सुर्वे हे मागाठाणे मतदारसंघाचे आमदार आहेत (Shivsena MLA Prakash Surve tested Corona Positive).
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना संकटात अनेक लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. मात्र, आता लोकप्रतिनिधींनादेखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. त्यानंतर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कोल्हापुरात तीन आमदारांना कोरोना
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाखांच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे आता लोकप्रतिनिधींनादेखील कोरोनाची लागण होत आहे. कोल्हापुरात आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव अशा 3 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
नांदेडमधील सहा लोकप्रतिनिधींनी कोरोना
नांदेडमध्ये जवळपास सहा नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये काही नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
1) अशोक चव्हाण (आमदार- भोकर, काँग्रेस) – कोरोनामुक्त
2) मोहन हंबर्डे (आमदार- नांदेड दक्षिण, कॉंग्रेस ) – कोरोनामुक्त
3) अमरनाथ राजूरकर (आमदार – विधानपरिषद, कॉंग्रेस) – कोरोनामुक्त
4) माधव जवळगावकर (आमदार- हदगाव, कॉंग्रेस) – उपचार सुरु
5) प्रवीण पाटील चिखलीकर (नांदेड जिल्हा परिषद सदस्य) – उपचार सुरु
6) प्रताप पाटील चिखलीकर (खासदार- नांदेड, भाजप) – उपचार सुरु
देशातील दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण
देशातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
केंद्रीय राज्यमत्री अर्जुन सिंह मेघवाल यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. येडियुरप्पा यांची कन्या पद्मावतीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, सुदैवाने पुत्र विजयेंद्र यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर येडियुरप्पा यांच्या कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले.
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती.
संबंधित बातम्या :
शिवसेना खासदार संजय मंडलिकांना कोरोनाची बाधा, कुटुंबातील दोघांना लागण