मुंबई : टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत चौकशीच्या फैऱ्यात अडकलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. येत्या सोमवारी (14 डिसेंबर) प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी हजेरी राहण्याचे आदेश दिले आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रताप सरनाईकांची ईडीने तब्बल सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. (ShivSena MLA Pratap Sarnaik Summons By ED)
मिळालेल्या माहितीनुसार, टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रताप सरनाईक यांना ईडीने समन्स बजावला आहे. यात ईडीने प्रताप सरनाईक यांना येत्या सोमवारी (14 डिसेंबर) चौकशीसाठी हजर राहा, असे आदेश दिले आहेत. पण विहंग सरनाईक यांना ईडीने समन्स बजावलेला नाही.
दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेनुसार ते ईडीच्या कार्यालयात गुरूवारी ( 10 डिसेंबर) सकाळी 11 वाजता हजर झाले. यावेळी त्यांची सतत सहा तास चौकशी चालली. ही चौकशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालली. या चौकशीत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.
प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरु केली. यावेळी त्यांनी टॉप्स सेक्यूरिटीच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत विचारण्यात आलं. तसेच, त्यांना कौटूंबिक माहितीही विचारण्यात आली. तुमच्या कुटुंबात कोण-कोण आहेत?, ते काय करतात?, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. तसेच, त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाबाबतही सरनाईक यांना विचारण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने अनेकवेळा समन्स बजावले होते. मात्र, दोघेही ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना अटकेपासून संरक्षण दिलेले आहे. कोर्टाने आपल्या आदेशात प्रताप सरनाईक यांची तसेच त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याचे अधिकार ईडीला दिलेले आहेत. मात्र, सरानईक यांना अटक करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशानंतर प्रताप सरनाईक गुरुवारी (10 डिसेंबर) ईडीसमोर हजर झाले. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सरनाईक यांना अनेक प्रश्न विचारले.
ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह विविध 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते.
ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी या दोघांमध्ये तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. (ShivSena MLA Pratap Sarnaik Summons By ED)
संबंधित बातम्या :
प्रताप सरनाईकांची तब्बल 6 तास चौकशी, ईडीकडून कोणते प्रश्न? सरनाईकांची प्रतिक्रिया काय?
प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण