मुंबई: अयोध्येतील जमीन घोटाळ्याविरोधात आवाज उठवला म्हणून भाजपचे नेते शिवसेनेला हिंदुद्रोही आणि राजद्रोही ठरवत आहेत. ही एकप्रकारची विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही, असे खडे बोल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला सुनावले आहेत. देशभक्ती आणि राजनिष्ठा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. देशावर प्रेम करणे व राज्यकर्त्यांवर प्रेम करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्या देशात त्याची गल्लत होत आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. (Shivsena MP Sanjay Raut Take a dig at BJP)
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. नताशा नरवाल, देवांगना कलिता या आंदोलकांना दिल्ली उच्च न्यायालयाने एक वर्षानंतर मुक्त करताना सरकारच्या मनसुब्यांवर ताशेरे ओढले. सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतला म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच वेळी केरळ हायकोर्टाने लक्षद्वीप बेटावरील सिनेनिर्मात्या आयशा सुल्ताना यांनाही अंतरिम जामीन मंजूर केला. लक्षद्वीपच्या राजकीय प्रशासकांवर टीका केल्याबद्दल आयशा यांच्यावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. आपल्या देशात राष्ट्रद्रोह इतका स्वस्त होईल असे वाटले नव्हते. स्वामीवर म्हणजे राजावर जो प्रेम करीत नाही तो राष्ट्रद्रोही या विचारावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आसुड ओढले आहेत, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
उगवत्या सूर्याचे पूजक हे राजनिष्ठच असतात. राष्ट्र संकटात असतानाही जे फक्त राजनिष्ठ म्हणून वावरतात त्यांच्यापासून राष्ट्राला खरा धोका आहे. आज राष्ट्रद्रोह म्हणजे नक्की काय? ते कुणीच सांगू शकत नाही. कोणत्याही सरकारच्या ‘चुका’ दाखवणे हा काही राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न ठरू शकत नाही. राजा चांगला असेल त्या वेळेला देशभक्ती आणि राजनिष्ठा यांची एकवाक्यताच असते. कारण त्या वेळी राजावर निष्ठा ठेवल्यानेच देशभक्ती केल्याचे पुण्य प्राप्त होते. परंतु राजा वाईट, मतलबी, व्यापारी वृत्तीचा असेल त्या वेळेला राजनिष्ठेपेक्षा देशभक्तीचे महत्त्व जास्त आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संबंधित बातम्या :
Special Report | राम मंदिराच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप!
…तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना
(Shivsena MP Sanjay Raut Take a dig at BJP)