Aaditya Thackeray Big Demand : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीसाठीचे मतदान पार पडत आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. “बहुमजली झोपडपट्ट्यांना पात्र करुन कायदेशीर घरं द्यावीत”, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.
“आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि खोके सरकारचे देखील हे शेवटचे अधिवेशन आहे. जेव्हा या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर झाला, त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की या अर्थसंकल्पात मुंबईसाठी तसेच महाराष्ट्रासाठी काय मिळाले? एकंदरीतच गाजर बजेट पाहायला मिळत आहे. पण मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर किंवा इतर शहर असतील त्यांना या बजेटमधून काहीही मिळालेलं नाही”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
“मुंबईत असो किंवा इतर ठिकाणी जिथे जिथे झोपडपट्टी पुनवर्सन हे प्रकल्प रखडले आहेत, तिथे म्हाडासारखे जसं आपण बीडीडीचा विकास केला तसंच कॉन्ट्रॅक्टर नेमून सरकारने विकास करावा, ही आमची पहिली मागणी होती”, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.
“तसेच बहुमजली ज्या काही झोपडपट्ट्या आहेत. अनेक ठिकाणी G+1, G+2 अशा झोपडपट्ट्या पाहायला मिळत आहेत. त्यांनाही पात्रता यादीत घेण्यात यावं. त्यांनाही पात्र करुन ही घर देण्यात यावीत. मी आज मिंधे सरकारला खोके सरकारला चॅलेंज करतो की हिंमत असेल तर आज शेवटचा दिवशी मुंबईसाठी, आमच्यासाठी ही मागणी मान्य करा. तसेच बहुमजली एसआरएदेखील मान्य करा, कारण ती मुंबईकरांची गरज आहे. जर आमचं सरकार आलं तर आम्ही हे करुच”, अशा दोन मागण्या आदित्य ठाकरेंनी मांडल्या.
दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवनवीन घोषणा करण्यात आल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण , शेतकऱ्यांना मोफत वीज, विद्यार्थ्यांना विद्यावेतन, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, ७ लाख लखपती दिदींसाठी, यांसह अनेक नवनवीन योजनांची घोषणा करण्यात आली. पण या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळालं नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.