शिवसेना उबाठा पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता आरपारची लढाई सुरु झाल्याची भाषा त्यांनी केली. राज्य सरकारने गेल्या ११ दिवसांत १६०० शासन निर्णय या सरकारने जारी केले आहे. दोन महिन्यांत आम्ही यामधील अनेक निर्णय रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी शपथसुद्धा घेतली.
मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की, १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र मी लुटारू आणि दरो़डोखोरांच्या हाती जाऊ देणार नाही. मी शपथ घेतो की, छत्रपती शिवराय आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी केली. ती मी अभेद्य ठेवेन. मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहांना रोखण्यासाठी मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहील. मी शपथ घेतो की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी हीच मशाल धगधगत ठेवेन.
महाराष्ट्राची ओळख सांगणारी ही लढाई आहे. महाराष्ट्राचं जे वर्णन आहे. मंगल देशा पवित्र देशा राकट देशा कोमल देशा, फुलांच्या देशा… दळभद्र्यांच्या देशा नाही. बुद्धीच्या देशा. हे वर्णन कायम ठेवायचं आहे. लाचार आणि गद्दारांच्या देशा असं करायचं नाही. आता असं कळलंय की ७० हजार कोटींचा घोटाळा करणारेही लाजून बाहेर पडणार आहेत. असं ऐकलंय. यांचा घोटाळा मोठा आहे. माझा तर काहीच नाही असं त्यांना वाटतंय. असं मी ऐकलंय. मी काही झालं तरी हा महाराष्ट्र भाजपच्या हाती जाऊ देणार नाही. फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र मोदी शाह यांच्या हाती जाऊ देणार नाही.
मुंबई पालिकेची एफडी तोडली. फक्त ४० हजार कोटी राहिले. ते पगारासाठी ठेवावे लागतात, तोडावी लागत नाही म्हणून ठेवली. ९० हजार कोटी उडवून टाकली. पावणे तीन कोटीची वर्क ऑर्डर यांनी काढली,. कोणती कामे. कुणाला दिली.
तीन तोंडी 50 खोक्यांचा रावण ठाकरे गटाकडून दहन करण्यात आला. 2011 पासून ठाकरे गटाचे कार्यकर्ते लितेश केरकर,विशाळ केरकर बंधू आणि हितेश टावरी रावण बनवत आले आहे. यंदा देखील 50 खोकेचा तीन तोंडी रावण बनवण्यात आला. तो उद्धव ठाकरे यांच भाषण संपताच दहन करण्यात आला.