Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानास आता आठ दिवस राहिले आहे. त्यामुळे राज्यभरात बड्या नेत्यांच्या प्रचारसभा होत आहे. उमेदवारांच्या रॅली निघत आहे. रात्रंदिवस प्रचार केला जात आहे. शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत आहे. यावेळी त्यांना धक्का देणारी बातमी कल्याणमधून आली आहे. कल्याण पश्चिम विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. ठाकरे गटाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बंड्या साळवी यांनी पत्र पाठवले आहे. त्या पत्रात त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पक्षातील घाणेरड्या राजकारणामुळे व्यथित होऊन आपण राजीनामा देत आहे. तसेच कल्याण पश्चिम विधानसभेत सचिन बसारे यांना उमेदवारी देताना आपणास विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत विजय साळवी यांनी राजीनामा दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
विजय साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण पक्षात निष्ठावान राहिलो. त्यानंतर आपणास जिल्हाप्रमुख आणि उपनेतेपद दिले गेले. परंतु कोणतेही कारण नसताना अचानक आपले जिल्हाप्रमुख पद काढून घेतले. तसेच पक्ष संघटनेतेमध्ये पदे देताना आपणास विश्वासात घेतले नाही. सचिन बासरे यांना कल्याण पश्चिमेची उमेदवारी देताना शिवसेना नेते विनायक राऊत हे खोटे बोलले. या सर्व अपमानास्पाद प्रकारामुळे आपण व्यतिथ झालो आहे, असे साळवी यांनी पत्रात म्हटले आहे.
शिवसेनेमधील बंडानंतर विजय साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर यावे, यासाठी त्यांना विविध प्रलोभन दाखवण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर दबाब आणण्यात आला. पोलिस दबावतंत्राचा वापर केला गेला. त्यांना तडीपार करण्याची नोटीस बजावली. त्यानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. गेल्या ४० वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत. ४० वर्षांच्या पक्षसेवेनंतर स्थानिक राजकारणामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचा राजीनामा हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.