बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके (KK) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी कोलकातामधील एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री त्यांचं पार्थिक कोलकाताहून मुंबईला आणण्यात आलं. मुंबईतील वर्सोवा (Versova) इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (funeral) करण्यात आले. यावेळी बॉलिवूड आणि संगीत विश्वातील अनेक कलाकार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. केके यांच्यावर त्यांच्या मुलाने अंत्यसंस्कार केले. यावेळी त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
बुधवारी पश्चिम बंगाल पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून केके यांना अखेरची सलामी दिली. काही वेळ कोलकातामधील रवींद्र सदन याठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवल्यानंतर ते मुंबईला आणण्यात आलं. मुंबईत जावेद अख्तर, शंकर महादेवन, विशाल आणि रेखा भारद्वाज, श्रेया घोषाल, अल्का याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य, जावेद अली, हरिहरन हे कलाकार केके यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते.
बुधवारी शवविच्छेदन केल्यानंतर अहवालात केके यांचा मृत्यू हृदयविकारानेच झाल्याचं सिद्ध झालं. केके हे दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर गेले होते. दोन महाविद्यालयांमध्ये त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. हॉटेलवर परतल्यानंतर त्यांना त्रास झाला आणि रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं.