मुंबई : अरबी समुद्रात संकट घोंघावतंय. कारण समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ प्रचंड वेगाने उत्तरेच्या दिशेला मार्गक्रमण करत आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर हाहाकार उडवण्याची भीती आहे. याशिवाय ते पुढे पाकिस्तानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे हवामानात प्रचंड बदल झाले आहेत. अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात समुद्र खवळलाय. समुद्राच्या उंचच्या उंच लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत. असं असताना मुंबईच्या जुहू बीच येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या जुहू बीच येथे सहा जण समुद्रात बुडाले आहेत. यापैकी दोन जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. तर इतर चौघांचा शोध सुरु आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
संबंधित घटना ही जुहू कोळीवाडा येथे घडल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्ती कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन स्थानिकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. पण चार जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरु आहे. संबंधित घटना ही आज संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी सध्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस आणि नौदलाचे जवान दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून बुडालेल्या नागरिकांचा शोध सुरु आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आलं आहे. मुंबई महापालिका, हवामान विभाग आणि इतर यंत्रणांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. या दरम्यान जुहू चौपाटीवर फिरायला आलेले सहा जण समुद्रात बुडाले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषत: कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो. याशिवाय वाऱ्याचा वेग वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. चक्रीवादळामुळे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारदेखील सतर्क आहे. प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचं पथक मुंबईतही दाखल झालं आहे.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज 56 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या वादळामुळे 15 जूनपर्यंत 95 गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.