मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापल आहे. मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत. तात्काळ आरक्षण द्या अशी मराठा समाजाची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील या आंदोलनाचा चेहरा आहेत. झटपट आरक्षणाचा निर्णय घ्या अशी त्यांची भूमिका आहे. मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेतला नाही, तर आज संध्याकाळपासून त्यांनी पाणी सोडण्याची घोषणा केली आहे. आमरण उपोषणाला सुरुवात केल्यानंतर ते पाणी सुद्धा घेत नव्हते. त्यामुळे सहाव्यादिवशी त्यांची प्रकृती खूपच खालावली. ते स्टेजवरच कोसळले होते. त्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने त्यांना पाणी पिण्याची विनंती केली. अखेर समाजाच्या पुढे मी नाही जाणार, असं म्हणत त्यांनी पाण्याचे काही घोट घेतले होते. आता ते पाणी पित आहेत, त्यामुळे त्यांची तब्येत थोडी चांगली आहे.
आज सकाळी मीडियाला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर आज संध्याकाळपासून ते पाणी बंद करणार आहेत. असं झाल्यास त्यांची प्रकृती आणखी ढासळू शकते. कारण आधीच त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाहीय. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकुल परिणाम होईल. त्यांनी मराठा आरक्षणासाठी तात्काळ विधानसभेच अधिवेशन बोलवण्याची मागणी केलीय. पण या अधिवेशनाने खरच प्रश्न सुटणार आहे का?. मराठा आरक्षणाचा विषय केंद्राच्या अखत्यारित येतो का? यावर राज्याच्या महाधिक्त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका मांडलीय.
मराठा आरक्षण आंदोलनाचा विषय चिघळतोय
आज सहयाद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलीय. त्यात महाधिवक्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं महाधिवक्ते तृषार मेहता म्हणाले. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलवण्यात काय फायदा आहे? हा प्रश्न निर्माण झालाय. सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचा विषय चिघळत चाललाय. काही ठिकाणी राज्यात हिंसाचाराच्या घटना घडतायत.