काँग्रेसमध्ये गळती सुरुच, ‘हे’ आमदार भाजपच्या गळाला, सूत्रांकडून मोठी बातमी

| Updated on: Feb 13, 2024 | 6:38 PM

काँग्रेस पक्षातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आज भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसला पुन्हा मोठा झटका बसण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसला आणखी गळती लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये गळती सुरुच, हे आमदार भाजपच्या गळाला, सूत्रांकडून मोठी बातमी
Follow us on

विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, 13 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्र काँग्रेसला लागलेलं ग्रहण काही कमी होताना दिसत नाही. काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या तीनही नेत्यांनी पक्षासाठी अनेक वर्ष काम केलं. त्यांनी पक्ष वाढवण्यात मोलाचं काम केलं. तसेच त्यांना पक्षाकडून अनेक चांगल्या जबाबदारी देखील मिळाल्या. हे तीनही नेते पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचं मानलं जात होतं. पण त्यांनी आता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसचे मुंबईतील बडे नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसचे मुंबईतील आणखी एक बडे नेते बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले नेते अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला.

अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज पार पडला. अशोक चव्हाण हे दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच ते काँग्रेसच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक होते. पण आता त्यांनी काँग्रेससोबतचं नातं तोडलं आहे. हेही असे की थोडे, त्यांच्यानंतर आणखी काही काँग्रेसचे नेते भाजपात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला लागलेली गळती कधी थांबेल? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

काँग्रेसचे ‘हे’ आमदार भाजपच्या गळाला लागल्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात काँग्रेसचे दोन आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर राजीनामा देण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे हे देखील काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जितेश अंतापूरकर यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी आज अशोक चव्हाण यांची भेट देखील घेतली आहे. त्यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र पत्रकारांशी बोलत असताना लवकरच नक्की सांगतो, असं अंतापूरकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अंतापूरकर हे देखील काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.