मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : महाविकास आघाडीत सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. देशात आता कधीही लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या सातत्याने बैठका पार पडत आहेत. मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये या बैठका पार पडत आहेत. या बैठकींमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत एकसंघ राहून भाजपला पराभव करायचा आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची देहबोली, त्यांची प्रतिक्रिया देखील तेच सांगत आहे. असं असलं तरी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात एकमत होताना फार अडचणी येताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं आहे. त्यांनी अनेकवेळा आपली इच्छा बोलून दाखवली आहे. त्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीला सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. त्यानंतर ते आज बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी काही जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना अधिकृतपणे बैठकीत येण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे नेते धैर्यवर्धन पुंडकर हे बैठकीला गेले. या बैठकीत पुंडकर यांनी पक्षाची भूमिका मांडली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा करुन कळवतो असं सांगत त्यांना बैठकीच्या बाहेर बसवलं. त्यानंतर एका तासापेक्षा जास्त वेळ पुंडकर बैठकीच्या बाहेर बसले. त्यांना बैठकीसाठी आतमध्ये बोलावणं न आल्याने ते वैतागून बाहेर पडले. यावेळी ट्रायडेंट हॉटेलबाहेर माध्यामांना प्रतिक्रिया देताना पुंडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला बैठकीत बोलवून अपमान केला, असं वक्तव्य केलं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला. पण प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या पराभवासाठी आपण मविआसोबत जाण्यास तयार असल्याचं सांगितलं.
धैर्यवर्धन पुंडकर यांनी अपमानास्पद वागणुकीचा आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आलं. या पत्रात वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत अधिकृतपणे सहभागी करुन घेण्यात आल्याचं आश्वासन देण्यात आलं. या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची स्वाक्षरी होती. पण प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसकडे खुलासा मागितला. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते आहेत. नाना पटोले यांना कुणाला आघाडीत सहभागी करुन घेण्याचे अधिकार देण्यात आल्याचं माहिती नाही. त्यामुळे काँग्रेसने याबाबत खुलासा करावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. दुसरीकडे नाना पटोले हे प्रकाश आंबेडकर यांना मविआत सहभागी करुन घेण्यात आल्याचं सांगत आहेत.
महाविकास आघाडीत मानापमानाच्या नाट्यानंतर आज पुन्हा एक बैठक पार पडली. ही बैठक महत्त्वाची होती कारण या बैठकीत प्रकाश आंबेडकर आज पहिल्यांदा सहभागी झाले. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी आपले मुद्दे मांडले. विशेष म्हणजे त्यांनी काही मतदारसंघावर दावा केला. त्यांना या मतदारसंघांमध्ये लोकसभेची उमेदवारी हवी आहे. सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, अमरावती या 5 लोकसभा जागांची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर महाविकास आघाडीचे इतर महत्त्वाचे नेते काय भूमिका मांडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.