एका छोट्या जिल्ह्याचे नाव काय बदलता? महाराष्ट्राचेच नाव बदला; अबू आझमी यांचं मोठं विधान

| Updated on: Jan 22, 2023 | 11:06 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धर्माचे राजकारण करतात. ते धर्माचे पोलोरायझेशन करतात. हे सरकार विकास नाही हिंदू-मुस्लीमांमध्ये भिंत उभी करण्याचं काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

एका छोट्या जिल्ह्याचे नाव काय बदलता? महाराष्ट्राचेच नाव बदला; अबू आझमी यांचं मोठं विधान
abu azmi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेनंतर आझमी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझं तोंड बंद होणार नाही. मी सत्य ते बोलतच राहणार, असं आझमी यांनी म्हटलं आहे. तसेच एका जिल्ह्याचं नाव काय बदलता. महाराष्ट्राचेच नाव बदला. महाराष्ट्राचे नाव संभाजी नगर ठेवा, अशी मागणीच अबू आझमी यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

कायद्याच्या अख्त्यारीत राहून कोणत्याही गोष्टीवर भाष्य करण्याचा मला या देशाच्या संविधानाने अधिकार दिला आहे. पण जेव्हा मी बोलतो तेव्हा ते काही कट्टरपंथीय लोकांना आवडत नाही. सहन होत नाही. त्यामुळेच मला धमकी दिली जाते. मी त्यांच्या काही गोष्टींना विरोध केला म्हणून मला धमकी आली. मरण कुणाच्या हातात नाहीये. देवाच्या हातात आहे. पण माझं तोंड बंद होणार नाही. मी बोलतच राहील, असं अबू असीम आझमी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नशिबात असेल तेच होईल

देशातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मिलाप व्हावा. दोन्ही धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदावीत असं मला वाटतं, असं सांगतानाच मला धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी दोन जणांना पकडलं होतं. माझा कुणावर संशय नाहीये. पण माझं कोणी काही करू शकत नाही. कारण नशिबात जे असेल तेच होईल, असंही ते म्हणाले.

सरकारकडून सुरक्षेत कपात

सरकारने माझी सुरक्षा कमी केलेली आहे.1995 पासून मला सुरक्षा होती. पण आता ती सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे. त्यात कपात करण्यात आलेली आहे. शिंदे-फडणवीस सरकारची जी मर्जी आहे तेच ते करतील, असंही ते म्हणाले.

त्या तीन जिल्ह्यांची नावे बदलण्याची तयारी सुरू

राज्यात तीन जिल्हे आहेत. या तिन्ही जिल्ह्यांची नावे मुस्लिम नावांवरून आहेत. अहमदनगर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद हे ते तीन जिल्हे आहेत. पण ही नावे बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. औरंगजेब रहमतुल्ला आला होता, असं ते म्हणाले.

तो किस्सा जगजाहीर

औरंगजेबचा बनारसच्या पंडिताच्या मुली सोबतचा जो किस्सा आहे तो जगजाहीर आहे. त्याने तिचं रक्षण केलं होतं. आपल्या शिपायाला हत्तीच्या पायदळी तुडवलं होतं. त्यामुळे हिंदूंनी बनारस येथे त्यांच्या स्मरणार्थ मस्जिद बांधलीये. औरंगजेबाने जे काही केलं ते 1947 ला संपलं होतं. पण त्याचा राजकीय फायदा घेतला जातोय, अशी टीका त्यांनी केली.

ही नावे बदला

एका छोट्या जिल्ह्याचे नाव का बदलताय? महाराष्ट्राचे नाव संभाजी महाराज नगर करा. रायगडचे नाव बदला. ठाण्याचं नाव बदला. नवी मुंबईचे नाव बदला, अशी मागणी करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धर्माचे राजकारण करतात. ते धर्माचे पोलोरायझेशन करतात. हे सरकार विकास नाही हिंदू-मुस्लीमांमध्ये भिंत उभी करण्याचं काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.