राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता फडणवीस दिल्लीत दाखल झालेत. थोड्याचवेळात त्यांची अमित शाह यांच्यासोबत भेट होणार आहे. त्यामुळं फडणवीसांनी राजीनामा द्यायचा का ? आणि तसं झाल्यास गृहमंत्री कोण होणार ?, याचाही फैसला होईल. त्यामुळे गृहखातं कोणाकडे जाणार याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.
लोकसभेतल्या महाराष्ट्रातल्या पराभवानंतर, उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा फडणवीसांनी व्यक्त केलीये आणि दुसऱ्याच दिवशी फडणवीस भाजपच्या नेतृत्वाला भेटण्यासाठी दिल्लीत आले आहेत. फडणवीस, अमित शाहांना भेटणार आहेत. आता दिल्लीत हायकमांडच फडणवीसांचा फैसला करणार आहे.
लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला पराभूत करु शकेल असा कोणता चेहरा असू शकतो याचाही शोध भाजप हायकमांड घेईल.
विशेष म्हणजे निवडणूक आणि आचारसंहिता संपल्यानंतर पहिलीच कॅबिनेट झाली आहे. पण फडणवीस मुंबईत नव्हते. पण ते नागपुरातून ऑनलाईन बैठकीला हजर राहिल्याची माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली. पण भाजपचे नेत्यांना अजूनही फडणवीस राजीनामा देणार नाही तर सोबतच राहतील अशी आशा आहे.
इकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मात्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीये. फडणवीसांचं बालनाट्य असून ते महाराष्ट्रातल्या राजकारणातले पुरुष आनंदीबाई असल्याची जळजळीत टीका त्यांनी केलीये.
विधानसभेसाठी तयारी करुन पूर्ण ताकदीनं उतरण्याचा प्लॅन फडणवीसांचा आहे. त्यासाठी संघटनेची जबाबदारी त्यांना हवी आहे अर्थात भाजप हायकमांडच त्यांचा निर्णय घेईल.
विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे महाविकासआडीला पराभूत करण्यासाठी मोठं काम फडणवीसांना करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना संपूर्ण राज्य पिंजून काढायचं आहे. त्यामुळेच ते राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यांनी राजीनामा देऊ नये असं भाजपच्या लोकांना वाटतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची भेट घेतली असून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.