मुंबई : मान्सून आला तरी पावसाने (Maharashtra Rain) दडी मारलीय. आवश्यक त्या प्रमाणात पाऊस पडत नाहीये. पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा (State Dam Water Storage) झपाट्याने कमी होतोय. सध्या राज्यातल्या धरणात फक्त 21.82. टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाणीसाठा आणि खरीप हंगाम पीक पेरणीचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी सादर केलेल्या अहवालानुसार पाणीसाठा खालावत चालल्याचं स्पष्ट झालं आहे. मागीच्या वर्षी याच कालावधीत राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा 26.43 टक्के होता. पण यंदा हाच पाणीसाठा 21.82 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे राज्यावर सध्या पाणी टंचाईचं (Water Scarcity) संकट घोंगावतंय.
सध्या राज्यातल्या धरणात फक्त 21.82. टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या घडीला पुण्यातल्या धरणांमध्ये पाणी सगळ्यात कमी उपलब्ध आहे. तो 12.82 टक्क्यांवर आला आहे. मागच्या वर्षी राज्यात या काळात सरासरी 270 मिमी पाऊस पडला होता. त्यातुलनेत यंदा मात्र केवळ 134 मिमी पाऊस झाला. जो सरासरीपेक्षा कमी आहे.
कोकणात ढगाळ वातावरण होतं. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या आणि काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकणात खरीप पिकाखाली सरासरी 4 लाख 42 हजार क्षेत्र असून फक्त 2.62 टक्के पेरणी झाली आहे. राज्यातील पेरण्यांची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीतील अहवालात देण्यात आली आहे. सध्या पुरेशा पावसाअभावी सर्वच विभागात पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पण मागच्या दोन-तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. भात आणि नाचणी पिकांच्या रोपांची कामे सुरू आहेत. ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांच्या पेरणीची कामे काही ठिकाणी सुरू झाली आहेत. राज्यात सध्या 13 टक्केच पीक पेरणी झाली आहे. राज्यात ऊस व खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र 151.33 लाख हेक्टर असून आतापर्यंत 20.30लाख हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी झाली आहे. म्हणजे आतापर्यंत सरासरी 13 टक्केच पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी सगळ्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.