अतुल कांबळे, TV9 मराठी, मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक परीवहन सेवा असलेल्या एसटी महामंडळाचा नावलौकीक एका गोष्टीकरीता नेहमीच होत असतो. लालमातीचा रस्ता असो की डांबरी रस्ता लालपरी मुक्कामी वेळेत पोहचवतेच अशी तिची ख्याती आहे. एसटीची विश्वासार्हता टिकविणाऱ्या 30 शिलेदारांचा नवी दिल्लीत गौरव केला जाणार आहे.
महाराष्ट्राच्या लाडक्या परीची विश्वासार्हता ! ही विश्वासार्हता एसटी महामंडळाने इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर कमावली आहे. या विश्वासार्हतेच्या याच ‘युएसपी’ला आता राष्ट्रीय पातळीवर गौरविले जाणार आहे.
एसटी महामंडळाकडे 18 हजार बसेसचा ताफा होता, आता एसकडे 16 हजार बसेस आहेत. यापूर्वी एसटीत एक लाख कर्मचारी आणि 65 लाख प्रवासी संख्या होती. आता प्रवाशांचे प्रमाण जरी घटले आहे. मात्र, तरीही आजही लालपरी ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणूनच ओळखली जाते. एसटीचा अपघाताचे प्रमाण प्रति लाख किलोमीटरमागे केवळ 0.13 ते 0.14 टक्के इतकाआहे.
एसटीच्या चालकांचा विनाअपघात सेवा बजावण्याच्या गुणांचा आदर म्हणून एसटी महामंडळ दरवर्षी संस्थेच्या 1 जून रोजीच्या वर्धापन दिनी सपत्निक सत्कार करीत असते.
एसटी चालकांच्या गुणांचा यंदा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात येणार आहे. असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकींग्ज ( एएसआरटीयू ) मार्फत होणार आहे. एएसआरटीयू ही संस्था सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील मान्यता प्राप्त संस्था आहे. देशातील सर्व राज्य परिवहन मंडळाच्या विकासासाठी कठीबद्ध असलेली ही संस्था 13 ऑगस्ट 1950 रोजी स्थापन झाली आहे.
एएसआरटीयू ही संस्था केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्था असून ती देशातील सार्वजनिक वाहतूकीची मानकसंस्था मानली जाते. देशातील 62 राज्य रस्ते परिवहन संस्था एएसआरटीयूच्या सदस्य आहेत. या सार्वजनिक परिवहन संस्थांच्या दीड लाख बसेसद्वारे दहा लाख नागरीकांना रोजगार देत आहेत.
नवी दिल्लीत कार्यालय असलेल्या या संस्थेमार्फत देशातील सर्व राज्याच्या परिवहन उपक्रमातील विनाअपघात चालकांची निवड केली जाणार आहे. संपूर्ण राज्यातून सेवाकालावधीत एकही अपघात नसलेल्या, विनाअपघात सेवा, विना तक्रार सेवा आणि कोणतीही शिक्षा न झालेले अशा एकूण 30 एसटी चालकांची निवड केली जाणार आहे.
महामंडळाच्या राज्यातील विविध विभागातील सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या ग्रामीण वाहतूकीचे दोन आणि शहरी वाहतूकीतील दोन अशा चार चालकांची तर जेथे केवळ ग्रामीण वाहतूक जेथे आहे, तेथील दोन चालकांची अशा एकूण 30 चालकांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.
येत्या रस्ता सुरक्षा मोहिमेत महामंडळाच्या विनाअपघात सेवा बजावणाऱ्यांना तसेच विनातक्रार सेवा आणि सेवाकाळात कोणतीही शिक्षा न झालेल्या एसटी चालकांचा नवी दिल्लीत गौरव केला जाणार आहे.