धारावीत मशिदीचा अनिधकृत भाग तोडण्यावरुन आज मोठा तणाव निर्माण झाला होता. मुंबई महापालिकेच पथक कारवाईसाठी पोहोचलं, त्यावेळी आंदोलक आक्रमक झालेले. पालिकेच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. लगेचच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. धारावातील काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. नंतर सर्व आंदोलक पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तिथे या वादावर तात्पुरता तोडगा निघाला आहे.
पोलीस स्टेशनमधील बैठक संपल्यानंतर आंदोलकांच्या नेत्याने आतमध्ये काय घडलं? त्याची माहिती दिली. “अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह सर्वपक्षीय नेते बैठकीला होते. आजची तोडक कारवाई थांबवण्यात आली आहे. वॉर्ड ऑफिसरने सहा ते आठ दिवसांची वेळ दिला आहे. आठ दिवस मशिदीच्या अनधिकृत भागावर तोडक कारवाई होणार नाही” असं हा नेता म्हणाला.
इथे बुलडोझर राज चालणार नाही
“आता आपल्याला तात्काळ कायदेशीर पावल उचलायची आहेत. मशिदीवरील ही कारवाई रोखण्यासाठी तात्काळ कोर्टात जाणार आहोत. आम्ही प्रयत्न करतोय, प्रयत्न यशस्वी करणं अल्लाहच्या हाती आहे. धारावीसह मुंबईत मशिद, चर्च, गुरुद्वारा असो तुटणार नाही. इथे बुलडोझर राज चालणार नाही. आजची तोडक कारवाई रद्द झाली आहे. तुम्ही घरी जाऊन आता प्रार्थना करा. आम्ही मशिदीचा भाग तोडण्यापासून रोखण्यासाठी कायदेशीर पावल उचलणार आहोत” असं या आंदोलकाने सांगितलं.