मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलवर ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान दगडफेक करण्याता आली आहे. आज गुरुवारी सकाळच्या सुमारास डोंबिवली आणि ठाकुर्ली दरम्यान अज्ञातांकडून एसी लोकलवर दगड मारल्याने तिच्या खिडकीच्या काचेचे नुकसान झाले आहे. एसी लोकल धावत असताना अचानक दगड मारल्याने या एसी लोकलच्या खिडकीची काचेला तडा गेला. या प्रकरणात सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आल्याचेही म्हटले जात आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून टिटवाळ्यावरून एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जात असताना ठाकुर्ली ते डोंबिवली दरम्यान एसी लोकलवर अज्ञात समाजकंटकाने दगड मारला. या दगडफेकीत एसी लोकलच्या काचेचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणा प्रवाशाला जखम झाली नाही. एसी लोकलवरील दगड फेकीची माहीती कळाल्यानंतर मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याआधीही एसी लोकलवर दगडफेक करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकरणातील काही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या एसी लोकलवर दगडफेक केल्याच्या प्रकरणात एका माथेफिरुला ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. आरपीएफ त्याची चौकशी करीत आहे. एसी लोकलवर वारंवार दगडफेकीच्या घटना घडल्याने रुळांशेजारील महत्वाच्या संशयित जागांवर सीसीटीव्ही देखील लावण्यात आले होते.
मध्य रेल्वेने अलिकडेच 6 नोव्हेंबर पासून मुख्य मार्गावर 10 एसी लोकल वाढविल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या एकूण एसी लोकलची संख्या आता 56 वरुन 66 इतकी झाली आहे. मात्र मध्य रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या मात्र पूर्वीप्रमाणेच 1810 राहीली आहे. साध्या लोकलच्या बदल्यात या दहा एसी लोकल वाढविल्याने साध्या लोकलीची संख्या दहाने कमी झाली आहे. पश्चिम रेल्वेनेही 6 नोव्हेंबरपासून एसी लोकलच्या 17 फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्याही साध्या लोकल तेवढ्या संख्येने कमी झाल्या आहेत.