विधान परिषदेची निवडणूक 3 दिवसांवर आलीये आणि सर्वात जास्त फोकसमध्ये आलेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर. विजयाचा कोटा 23 मतांचा आहे. आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकूण 16 आमदार आहेत. असं असताना मिलिंद नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात उरतलेत. सर्वपक्षीय संबंधांमुळं नार्वेकरांनी भेटीगाठीही सुरु केल्या आहेत. नार्वेकरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोलेंनाही भेटले. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांचीही भेट घेतली. बहुजन विकास आघाडीकडे 3 मतं आहे, त्यामुळं हितेंद्र ठाकूरांनाही नार्वेकर भेटले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनाही नार्वेकर भेटले.
आदित्य ठाकरेंनीही, मिलिंद नार्वेकरांच्या बाबतीत सूचक विधान केलंय. नार्वेकर क्रिकेटच्या डकवर्थ लुईस प्रमाणं खेळतात असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. विधानसभेच्या आमदारांच्या मतांवरुन विधान परिषदेचे 11 उमेदवार निवडून जातील. मात्र 12 उमेदवार असल्यानं आणि गुप्त मतदान पद्धतीमुळं क्रॉस व्होटिंग होणार हे निश्चित आहे. त्यामुळं एका उमेदवाराचा पराभव हा अटळ आहे. पण मिलिंद नार्वेकरांना अधिक मदत ही काँग्रेसचीच होणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे अपक्ष शंकरराव गडाख यांच्यासह एकूण 16 मतं आहेत. नार्वेकरांना विजयासाठी आणखी 7 मतांची गरज आह. काँग्रेसकडे 37 आमदार आहेत. 23 मतांच्या कोट्यानुसार प्रज्ञा सातव विजयी होवून 14 मतं शिल्लक राहतात. मात्र क्रॉस व्होटिंगच्या भीतीमुळं सातवांना 4 मतं अधिक दिली तर 10 मतं राहतील. या 10 पैकी 7 मतं दिली, तर 23 च्या कोट्यानुसार नार्वेकर विजयी होतील
पण त्याच वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शेकापचे जयंत पाटीलही रिंगणात आहे. शरद पवारांची राष्ट्रवादीकडे 12 आणि शेकापचा 1 आमदार अशी 13 मतं आहेत. त्यांना विजयासाठी आणखी 10 मतं हवीत. काँग्रेसकडील शिल्लक मतं गेल्यावरही आणखी मतं जयंत पाटलांना लागतील. मात्र नार्वेकरांप्रमाणंच जयंत पाटलांचेही सर्वपक्षीय चांगले संबंध आहेत. त्यामुळं काँग्रेससह अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही धाकधूक आहेच.
बहुजन विकास आघाडीकडे 3 मतं आहेत आणि हितेंद्र ठाकूरांनीही शरद पवारांसह शिंदे आणि फडणवीसांचीही भेट घेतली. त्यामुळं बविआची 3 मतं कोणाकडे हा सस्पेस शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार. महायुतीचे 9 उमेदवार आहेत. आणि आमदारांच्या संख्याबळानुसार 9 व्या उमेदवारासाठी महायुतीला 10 मतांची गरज आहे. त्यामुळं महायुतीच्या नजराही छोट्या पक्षांसह महाविकास आघाडीच्या मतांकडे असेल. त्यासाठी फडणवीसांनी पुन्हा एकदा खास लक्ष दिलंय. मतांचं गणित नेमकं कसं असावं, पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची याचं मार्गदर्शन फडणवीस करणार आहेत. याआधी एकदा ठाकरेंचे आणि दुसऱ्यांदा काँग्रेसची मतं फुटल्याचं दिसलेलंच आहे. आता गोरंट्याल म्हणतात त्याप्रमाणं भूंकप येवून कोणाला हादरे बसतात, हे 12 तारखेलाच स्पष्ट होईल.