मुंबई : येत्या 04 ऑक्टोबरपासून मुंबईमध्ये शाळा सुरु होणार आहेत. यावर बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. शाळा प्रवेशासाठी पालकांवर कुठल्याही प्रकारे जबरदस्ती करण्यात येणार नाही. पालकांनी संमतीपत्र सादर केल्यानंतरच मुलांना शाळेत प्रवेश दिला जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (1 ऑक्टोबर) भायखळा (पूर्व ) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेडणेकर बोलत होत्या या परिसंवादात पुन्हा शाळा सुरु करण्याबाबत मनपा माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच विद्यार्थ्यांचे पालक यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उप महापौर अँड.सुहास वाडकर, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, शिक्षणाधिकारी (प्रभारी ) राजू तडवी तसेच माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व मनपा शिक्षण विभागाचे अधिकारी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर संवाद साधताना म्हणाल्या की, “महाराष्ट्र शासन, टास्कफोर्स यांची मान्यता घेऊन तसेच महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यात येत आहेत. 2 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण शाळांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे, असे पेडणेकर म्हणाल्या. तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यासुद्धा निर्जंतुकीकरण करून घेण्याचे निर्देश यावेळी पेडणेकर यांनी दिले.
तसेच, शंभर टक्के उपस्थितीची अट शिथिल करण्यात आली असून एका बेंचवर एक याप्रमाणे फक्त पंचवीस विद्यार्थ्यांना त्या – त्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासोबतच शाळेत न येणाऱ्या मुलांसाठी ऑनलाईन वर्गाचेसुद्धा आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचे दैनंदिन तापमान नोंदविल्यानंतरच प्रवेश देणे, तसेच 25 विद्यार्थी क्षमतपेक्षा जास्त विद्यार्थी झाल्यानंतर आज ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे त्या विद्यार्थ्यांना उद्या प्रवेश न देता एक दिवसाआड या पद्धतीने प्रवेश देण्यात यावा, असे महापौर यांनी सांगितले.
तसेच, ज्या शाळा मोकळ्या आहेत त्या प्रथम टप्प्यात सुरू करण्यात येणार असून कोविड केंद्र व लसीकरण केंद्र असलेल्या शाळा मोकळ्या झाल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यासोबतच विभागनिहाय शाळांना अचानक भेटी देऊन तेथील शाळेची पाहणी केली जाणार आहे. शाळेसोबत आरोग्य केंद्र संलग्न करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच ज्या पालकांची प्रवासाची समस्या आहे त्या पालकांबाबत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून त्यांना रेल्वेची पास कशी देता येईल, असेदेखील पेडणेकर म्हणाल्या.
त्यासोबतच मुले एकत्र खेळणार नाहीत, डब्बा खाणार नाहीत याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. आजारी मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही. त्यासोबतच शाळेच्या इमारतीचे आठवड्यातून तीन दिवस निर्जंतुकीकरण करून घेण्यात येईल. तशी तजवीज करावी असे निर्देश पेडणेकर यांनी जिले. यावेळी काही पालकांनाही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. पालकांनी केलेल्या सूचनेनुसार योग्य ते नियोजन करण्यात येणार आहे.
इतर बातम्या :
इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना, कॉसिस ई-मोबिलिटी आणि राज्य सरकारमध्ये 2823 कोटींचा सामंजस्य करार
ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला फडणवीसांचा पाठिंबा, म्हणतात, त्याचा पाठपुरावा तर आम्हीच केला होता!