चालत्या गाडीवर उभा राहून स्टंट, काही लाइक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ

| Updated on: May 29, 2024 | 7:53 PM

सोशल मीडियावर काही लाईक्स मिळवण्यासाठी लोकं आता जीव धोक्यात घालून रील्स बनवू लागले आहेत. अनेक घटनांमध्ये आपण पाहिलं आहे की, कशाप्रकारे लोकांनी आपला जीव गमावला आहे. पण तरी देखील लोकं यापासून धडा घेताना दिसत नाहीत.

चालत्या गाडीवर उभा राहून स्टंट, काही लाइक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ
Follow us on

रील बनवण्यासाठी लोकं कुठल्या थराला जातील याचा काही अंदाज नाही. अनेक जण आता यासाठी स्टंट करताना दिसत आहेत. लोक रीलचे इतके वेडे होत आहेत की आपला जीव देखील धोक्यात घालत आहेत. कधी कोणी चालत्या वाहनाच्या बोनेटवर बसून हिरोपंती करताना दिसतो, तर कधी कोणी वाहतुकीचे नियम झुगारून धोकादायक स्टंट करतोय. आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चालत्या कारच्या छतावर उभा राहून धोकादायक स्टंट करताना दिसत आहे.

चालत्या गाडीवर स्टंट

काही लाइक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक जीवाशी खेळत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ हा मुंबईतील असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीसही त्याचा शोध घेत आहेत.  हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @Siya17082000 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबत नवी मुंबई पोलिसांना टॅग करून प्रतिक्रिया दिली असून, ही घटना नवी मुंबई परिसरातील असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करताना सिया नावाच्या युजरने लिहिले आहे की, ‘आता पोलिस या व्हिडिओचा ‘पार्ट 2′ अपलोड करतील.’

लोकांची कारवाईची मागणी

चालत्या गाडीत धोकादायक स्टंट पाहून लोकं नेहमीच संताप व्यक्त करतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ येत असतात. पोलिसांकडून देखील त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण ज्यांची मानसिकताच बिघडलेली असेल त्यांच्यावर कारवाईचा तरी परिणाम होईल का असा प्रश्न पडतो.

या व्हिडिओत जी गाडी दिसत आहे ती राजस्थानची पासिंग असल्याचं दिसत आहे. मारुती स्विफ्टच्या छतावर उभा राहून तो स्टंट करत आहे. एका युजरने लिहिले की, ‘या व्यक्तीचा परवाना रद्द करण्यात यावा जेणेकरून तो इतरांचे जीव धोक्यात घालणार नाही. रस्त्यावर अशा लोकांपासून धोका आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘मला वाटले की पुढचा भाग रुग्णवाहिका किंवा हॉस्पिटलमधून येईल.’ एका युजरने लिहिले की, हे खूपच संतापजनक आहे.