अमर भिंगारदे, Tv9 मराठी, मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : सध्या फिट राहण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. सकाळी उठून जॉगिंगला जाणे, योगा करणे, जिमला जाणे. तरुणांचा सध्या जिमकडे जाण्याचा जास्त कल आहे. जिममध्ये गेल्यावर चांगली बॉडी करावी, प्रत्येकामध्ये आपणच उठून दिसावं, अशी काही तरुणांची महत्त्वकांक्षा असते. पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. बॉडी बिल्डर होणं सोपं नाही. पण काही तरुण खूप मेहनत घेतात, अनेक अडचणींचा सामना करतात आणि बॉडी बिल्डर बनतात. यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचतात आणि फिटनेस क्षेत्रात नावरुपाला येतात. आम्ही आज अशाच होतकरु, मेहनती आणि यशस्वी तरुणाची कहाणी सांगणार आहोत ज्याने बॉडी बिल्डिंग क्षेत्रात अनेक किताब जिंकले आहेत. त्याचं नाव आहे IFBB PRO विनर मनोज पाटील!
एक मराठी मुलगा ज्याची आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात ओळख आहे, अशा बॉडी बिल्डर मनोज पाटीलची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मनोप पाटील हा मुळचा कोल्हापूरचा आहे. मनोजचं म्हणणं आहे की, सध्याच्या तरूणांना काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्वाचं नाही ते कळत नाही. बॉडी बिल्डींग ही स्पर्धा एक वेगळी आहे आणि फिटनेस हे वेगळं आहे. हे तरूणांना समजणं महत्त्वाचं आहे.
16-17 वयोगटातील मुलांचा एक वेगळा समज आहे, असं मनोजने सांगितलंय.
गरिब घरातून माझं बालपण झालं, सकाळी जेवण असेल तर रात्री जेवण नाही, अशी माझी परिस्थिती होती. पण जिद्द आणि चिकाटी असेल तर मुलगा काहीही करू शकतो, वयाच्या 13व्या वर्षापासून मी पेपर टाकण्याची काम केलं. दूध विकणे, गाड्या धुणे आणि रस्त्यावर देखील झोपून दिवस काढले. माझ्या या गोष्टीच माझ्यासाठी प्रेरणा देणाऱ्या होत्या, असं मनोज सांगतो.
17 व्या वर्षी मला बॉडीबिल्डींग विषयी कळालं. घरातील डाळ-भात खाऊन मी बॉडीबिल्डींग केली. परिस्थिती बघून मी बॉडीबिल्डींग केली आणि यश मिळालं, असं मनोज सांगतो.
खर्च कशाप्रकारे करावं हे सर्व करण कठीण होतं. मी गरिब परिस्थितीमधूनचं आलो. आता सध्या तरी प्रोटीनसाठी पैसे उपलब्ध होतात पण तेव्हा माझ्याकडे इतके पैसे देखील नव्हते. प्रोटीन घेण्यासाठी मला 5-6 वर्ष लागली. आता सोशल मीडिया आहे, आताच्या युवकांना आर्थिक परिस्थितीप्रमाणे पुढील पाऊल उचलावे, असं आवाहन मनोज पाटीलने केलं आहे.
माझ्या आयुष्यात मिस्टर इंडिया पद पटकावल्यानंतर खरा बदल झाला. आधी फक्त शेजारी ओळखत होते. 2010 साली जिममध्ये नोकरी मिळाली. त्यामुळे माझे आर्थिक संकट टळत गेले, असं मनोजने सांगितलं. मनोजने ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर सविस्तर माहिती दिली आहे. फेक आणि ओरिजिनल सप्लिमेंटमधील फरक कसा ओळखायचा? दुखापत झाल्यावर काय करावं? याबाबत त्याने सविस्तर भूमिका मांडली आहे.