मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना करणारे पुस्तक मागे घेण्याची मागणी होत असेल तर शरद पवार यांच्याबाबत वापरले जाणारे ‘जाणता राजा’ हे शब्ददेखील जिथे कुठे असतील तिथून काढण्यात यावे”, अशी मागणी भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करणारे एक पुस्तक काल (12 जानेवारी) प्रकाशित झाले. हे पुस्तक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहले आहे. या पुस्तकाचे नाव ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे आहे. या पुस्तकावरुन राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. विरोधकांनी या पुस्तकावरुन भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. “कुणाचे मन दुखावेल असे कोणतेही कृत्य भारतीय जनता पार्टी करणार नाही. पुस्तकावरुन सुरु असेलेल शुद्र राजकारण योग्य नाही”, असे मुनगंटीवार म्हणाले.
“राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी जनादेशाचा अवमान करत बेईमानीने सरकार स्थापन केले. संजय राऊत यांची तुलना चाणक्यशी करण्यात आली. संजय राऊत चाणक्यच्या केस आणि नखाशी बरोबरी करु शकत नाही. जेव्हा बांगलादेशचं युद्ध देशानं जिंकलं तेव्हा स्वर्गीय इंदिरा गांधी यांची तुलना माँ दुर्गेशी केली गेली होती. ‘इंडिया इज इंदिरा’, असं म्हटले गेले. पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी त्यांच्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अवमान करणारे लिखाण केले होते”, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजा या ब्रम्हांडात होणे शक्य नाही. जबतक सूरज-चाँद रहेंगा तबतक छत्रपती शिवाजी महाराज का नाम अमर रहेंगा”, असे देखील मुनगंटीवार म्हणाले.