राष्ट्रवादीमधील सस्पेन्स संपला, अखेर राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव, पडद्यामागे काय, काय घडले?

| Updated on: Jun 13, 2024 | 3:55 PM

sunetra pawar in rajya sabha: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार जाणार आहे. त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कोण जाणार? याची चर्चा सुरु होती.

राष्ट्रवादीमधील सस्पेन्स संपला, अखेर राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव, पडद्यामागे काय, काय घडले?
अजित पवार, सुनेत्रा पवार
Follow us on

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेला सस्पेन्स गुरुवारी संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार जाणार आहेत. त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कोण जाणार? याची चर्चा सुरु होती. त्यानंतर हा सस्पेन्स संपला आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

असा झाला निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नावे चर्चेत होती. सुनेत्रा पवार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना संसदेत मागील दाराने पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याचीही माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

पक्षातील एक गट नाराज

राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक जण इच्छूक होते. त्यात छगन भुजबळ यांच्याबरोबर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी ही नावेही होती. परंतु सुनेत्रा पवार यांनी बाजी मारली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट नाराज झाला आहे. पक्षातील कार्यपद्धतीवर या गटाकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. पक्षातील निर्णय सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफ्फुल पटेल हेच घेत असल्याचा आरोप केला जात आहे. पक्षातील निर्णय घेतांना इतरांशी सल्लामसलत होत नसल्याचा आरोप केला जात आहे. आधीच नाव निश्चित करायचे पण ऐनवेळी उमेदवारी घोषित करायची असेल तर काय अर्थ? असे या गटाकडून म्हटले जात आहे.

रोहित पवार यांचे ट्विट

दरम्यान, अजित पवार गटातील राज्यसभा उमेदवारीवरुन रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, असे खोचक वक्तव्य त्यांनी केले आहे.