‘बारामतीच्या भावी खासदार सुनेत्राताई पवार’, मंत्रालयाबाहेर अजित पवार गटाची बॅनरबाजी

| Updated on: Dec 04, 2023 | 7:43 PM

मंत्रालयाबाहेर अजित पवार गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा फोटो या बॅनरमध्ये दिसत आहे. अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. सध्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाच्या खासदार आहेत. पण मंत्रालय परिसरात सुनेत्रा पवार यांचा बारामतीच्या भावी खासदार असा उल्लेख करणारा बॅनर झळकवण्यात आला आहे.

बारामतीच्या भावी खासदार सुनेत्राताई पवार, मंत्रालयाबाहेर अजित पवार गटाची बॅनरबाजी
Follow us on

अक्षय मंकणी, Tv9 मराठी, मुंबई | 4 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतेक आमदारांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते त्यांच्यासोबत गेले आहेत. दोन्ही गटाची निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात कायदेशीर लढाई सुरु आहे. दोन्ही गटांकडून पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा करण्यात आला आहे. असं असताना आता अजित पवार शरद पवार गटाला धक्का देणारी रणनीती आखत असल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी काळात राज्यात लोकसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीत अजित पवार गट शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे याबाबतच्या चर्चांना आणखी बळ देणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. मंत्रालयाबाहेर सुनेत्रा पवार यांचा बारामतीच्या भावी खासदार असा उल्लेख करणारा बॅनर झळकवण्यात आला आहे.

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मंत्रालयाबाहेर बॅनरबाजी

मुंबईत मंत्रालय परिसरात सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार असे बॅनर झळकले आहेत. सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. मंत्रालयाच्या समोर असणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर हे बॅनर लावण्यात आलं आहे. अजित पवार गटाचं नुकतंच कर्जमध्ये चिंतन शिबर आयोजित करण्यात आलं होतं. या चिंतन शिबारात अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं होतं.

सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवार देणार आणि हे चारही मतदारसंघ जिंकणं अत्यंत गरजेचं आहे, असं मत अजित पवारांनी मांडलं होतं. त्यानंतर आता अजित पवार गटाच्या समर्थकांकडून सुनेत्रा पवार या बारामती मतदारसंघातून खासदार होतील, असा दावा करत भावी खासदार म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.