रत्नागिरी: शिवसेना नेते अनंत गीते यांनी शरद पवार आमचे गुरू होऊच शकत नाही, असं विधान केलं आहे. गीते यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पलटवार केला आहे. महाविकास आघाडी झाली तेव्हा अनंत गीतेंनी पवारांच्या पायाला हात लावला होता. पवारांच्या पाया पडले होते. आणि आघाडी केल्याबद्दल आभारही मानले होते, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे. (sunil thakre reply to shiv sena leader anant geete over his statements)
अनंत गीते यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गीते यांच्या आरोपाचा समाचार घेतला. अनंत गीते दोन वर्षे अज्ञातवासात की विजनवासात होते हे माहीत नाही. परंतु, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होत असताना बांद्रा परिसरातील एका हॉटेलमध्ये अनंत गीते आले होते. त्यावेळी त्यांनी आदरणीय पवारसाहेबांना अतिशय वाकून नम्रपणे पायाला हात लावत केलेल्या आघाडीबद्दल आभार मानले. या घटनेचा मी साक्षीदार आहे, असं तटकरे यांनी सांगितलं.
अलीकडच्या काळात अनंत गीते यांची अवस्था राजकीयदृष्टया ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशापध्दतीची झाल्यामुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी वक्तव्य केल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली. अनंत गीते बोलल्याने काही फरक पडत नाही. परंतु सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. आघाडीचे जनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वच्छपणाने राज्याचे काम करत आहेत. कोविडसारख्या महामारीचा मुकाबला महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करतोय याची प्रशंसा होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांना या सार्या कृतीचं भान राहिलेलं नाही, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी पक्ष हा सिध्दांतावर… पवारसाहेबांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवर… शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास असणारा पक्ष या राज्यात आहे. तसेच देशाच्या जडणघडणीत पवारसाहेबांच्या उत्तुंग नेतृत्वामुळे राष्ट्रवादीचे अढळ स्थान कुणी बोलल्याने कमी होणार नाही, असं सांगतानाच भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याला अनंत गीते हे उत्तर देतील अशी भाबडी आशा शिवसैनिकांच्या मनात होती. परंतु 2014 आणि 2019च्या निवडणुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेंचा स्वाभिमान त्यांच्या पक्षनेतृत्वाबद्दल अशाप्रकारची वक्तव्ये आली त्यावेळी गळून पडला होता, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.
दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले. (sunil thakre reply to shiv sena leader anant geete over his statements)
संबंधित बातम्या:
त्यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित, मी पहिल्यापासून सांगतोय, फडणवीसांची गीतेंच्या विधानाला हवा
कोण आहेत वैभव खेडेकर ज्यांच्याविरोधात रामदास कदम 100 कोटीचा मानहानीचा दावा करण्याची घोषणा करतायत?
(sunil thakre reply to shiv sena leader anant geete over his statements)