राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्तांतर नाट्य घडले. शिवसेनेत उभी फुट पडली. भाजप-शिंदे सेनेचे सरकार सत्तारुढ झाले. त्यानंतर नाही, हा म्हणता म्हणता राष्ट्रवादीतही फुट पडली. सहकाऱ्यांसह अजितदादा महायुतीत सहभागी झाले. त्यांनी दोन वर्षानंतर सत्ता नाट्यवेळी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कसे भेटायला जायचो. वेशांतर करायचो याची माहिती माध्यमांना दिलखुलासपणे नुकतीच दिली. त्यावरुन संजय राऊत यांनी तोंडसुख घेतले तर आता सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल चढवला.
भेटीनाट्यावर हल्लाबोल
सत्ता नाट्यवेळी अमित शाह यांच्याशी दहा वेळा भेट झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती. त्यासाठी नावाचा शॉर्ट फॉर्म, लघु रुप वापरत असल्याचे आणि वेषांतर केल्याची माहिती त्यांनी दिली. या काळात विमानाचा साधा प्रवास केल्याची पुस्ती त्यांनी जोडली होती. त्यावर सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल चढवला.
अजितदादा नाव बदलून तुम्ही का जात होते असा प्रश्न त्यांनी विचारला. उद्या एखादा दहशतवादी नाव बदलून येईल. दिल्ली आणि मुंबई विमानतळ, एअरलाईन यांची चौकशी झाली पाहिजे. नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी यांचे उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली. असा हलगर्जीपणा असेल तर उद्या एखादा दहशतवादी भेटायला येईल, असा टोला त्यांनी लगावला.
तुम्ही महाराष्ट्रसोबत बेईमानी केली
महाराष्ट्राचे LOP वेषांतर करून दिल्लीत यायचे असा त्यांनी खुलासा केला आहे. LOP असताना तुम्ही चोरून अमित शाह यांना का भेटत होता ? तो त्या पदाचा अपमान आहे, तुम्ही महाराष्ट्र सोबत बेइमानी करत होता. अमित शाह यंच्यसोबत काय बोलत होते? ते चोरुन भेटायला का येत होते ? अशी प्रश्नांची सरबत्ती करुन सुप्रिया सुळे यांनी कडाडून टीका केली.
2 जुलै रोजी शपथ घेतली. त्याच्या 5 दिवस आधी मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप अजित पवार यांच्यावर केले होते. मग आधीच्या 10 भेटी कधी झाल्या, असा रोकडा सवाल त्यांनी केला. याचे उत्तर देवेंद्र फडणवीस देणार आहेत का? जर शरद पवार यांना माहीत होत मग चोरून यायची काय गरज होती, दिल्लीला चोरून येण्यासारखं काय आहे, मी विमान वाहतूक मंत्र्यांना याबाबत विचारणा करणार आहे, असे त्या म्हणाल्या.
भाजप सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचार बोकाळला
आज अजित पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी नाव बदललं. हे आपल्या राज्याच्या राजकारणाचे संस्कार नाही. हा देश संविधानाने चालतो संविधानाच्या चौकटीत याला जागा नाही, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात भाजपच सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढला आहे, असा घणाघात सुळे यांनी घातला. कोयता गँग, महिला अत्याचार या घटना वाढल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. यावर त्यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.