मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या दोन महिन्यांमध्ये काही अनपेक्षित अशा घटना घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षात मोठी फूट पडलीय. पक्षफुटीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हार मानलेली नाही. अजित पवार यांना जवळपास 40 आमदारांनी पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीचं प्रकरण आता निवडणूक आयोगात गेलंय. विशेष म्हणजे शरद पवार अजूनही परिस्थितीशी संघर्ष करत आहेत. ते वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करुन सभा घेत आहेत. ते भाजपवर सडकून टीका करत आहेत.
शरद पवार एक नेते म्हणून राजकारणाच्या मैदानातले कसलेले पैलवान आहेत. पण ते वडील म्हणून नेमके कसे आहेत? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सुप्रिया सुळे यांनी ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाला मुलाखत दिली. या मुलाखतीचा प्रोमो शेअर करण्यात आलाय. यामध्ये त्यांना शरद पवार वडील म्हणून कसे आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
“शरद पवार खूप बोलत नाहीत. कमी बोलतात. मी ज्यादिवशी पहिल्यांदा लोकसभा निवडून गेले, तेव्हा मला घरातून जाताना, मी आमच्या दिल्लीच्या ‘6-जनपत’ या घरातून निघाले तेव्हा मला ते एक गोष्ट म्हणाले की, आज तू पहिल्यांदा गेट नंबर 1 ने लोकसभेची खासदार म्हणून चालली आहेस. आयुष्यभर एक लक्षात ठेव, ही जी गेट नंबर एकच्या पायरी आहे ती तुला चढण्यासाठी संधी मिळाली ती फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांमुळे मिळाली. तू ही पायरी चढताना मतदारांना लक्षात ठेवशील तोपर्यंत ही पायरी तुला चढता येईल. ज्यादिवशी तू मतदारांना विसरशील त्यादिवशी तुला ही पायरी चढता येणार नाही”, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना फोन लावत एकतर्फी संवाद साधला. “हॅलो! नमस्कार चव्हाण साहेब, मी सुप्रिया बोलतेय. मी खरंतर तुम्हाला माफी मागायला फोन केला. कारण आम्ही जे राजकारण आणि समाजकारण करतोय ते तुमच्या नावाने, विचाराने, आशीर्वादाने करतो. पण आज महाराष्ट्र प्रचंड अस्वस्थ आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“तुम्ही महाराष्ट्राचा जो मंगल कलश आणला, तुमचे विचार घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न आम्ही सगळेच करतोय. पण त्याच्यात आज महाराष्ट्र देशामध्ये अव्वल नंबरवर नाहीय याचं मला फार भयंकर दु:ख होतं. तुमच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे, तो आज नाहीय. तो प्रचंड अस्वस्थ आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.