मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची औरंगाबाद तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईत सभा होणार आहे. या दोन्ही सभांवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. तुम्हीच म्हणता आज महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा हा माझा शब्द नाही. तुमचाच शब्द आहे. नाटक हे नाटक असतं हो. तीन तास जायचं, एन्जॉय करायचा आणि घरी जायचं. ते वास्तव थोडीच असतं. तो ड्रामा असतो हो, अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हा टोला लगावला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करतानाच राज ठाकरे आणि फडणवीसांवर टीका केली. तसेच राज ठाकरे यांच्या सभेला शुभेच्छा देतानाच राज यांच्या भोंग्यावरून सरकारला अल्टिमेटम देण्याच्या इशाऱ्याची खिल्लीही उडवली.
राज ठाकरेंना मनापासून शुभेच्छा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत अल्टिमेटम दिला आहे. त्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. मी ज्या संस्कृतीत वाढले. त्या संस्कृतीत अल्टिमेटम शब्द बसत नाही. यशवंतराव चव्हाणांनी अल्टिमेटम हा शब्दच कधी वापरला नाही. त्यामुळे मला त्या शब्दाचा अर्थ समजत नाही. इंग्रजी डिक्शनरीत तो शब्द आहे, काही तरी अर्थ आहे त्याचा. पण उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचं सक्षम सरकार आहे. ते चांगलं काम करतंय. हे मी म्हणत नाही. केंद्राचा डेटाही तेच सांगतोय, त्याचबरोबर कार्यक्षम होम मिनिस्टर आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू या, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
देशात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील घटनांनी मला प्रचंड वेदना झाल्या. महाराष्ट्रात थोडं घडलं, ते वाईट आहे. पण उत्तर प्रदेश आणि दिल्ली जे घडलं ते फारच चिंताजनक आहे, असंही त्या म्हणाल्या.
राज ठाकरे यांची आज सभा आहे. वंचित आघाडीने या सभेला विरोध केला आहे. त्यामुळे काही तरी घडण्याची चिन्हे आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनाच धारेवर धरले. मला भविष्यवाणी कळत नाही. जर तर मला समजत नाही. पण तुमच्याकडे अशी काही माहिती असेल आणि असं काही होणार असेल तर पोलिसात जा आणि तक्रार करा. पत्रकार असण्यापेक्षा मी माणूस नागरिक आहे. आपल्या महाराष्ट्राबद्दल प्रत्येकाला प्रेम वाटलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही पोलिसांत तक्रार दिली पाहिजे. पोलिसांना माहिती दिली पाहिजे, असं त्या म्हणाल्या.