टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकवून भारतीयांचा उर अभिमानाने भरला आहे. त्यामुळे सर्वत्र टीम इंडियाचं कौतुक होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. विधान भवनात सेंट्रल हॉलमध्ये या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात टीम इंडियाचा खेळाडू सूर्यकुमार यादव याने मराठीत भाषण केलं. सूर्यकुमार इतकं छान मराठी बोलला की अनेकांचे चेहरे आश्चर्यचकीत झाले. सूर्याने मराठीत ठसकेबाज पद्धतीने भाषण करत सर्व आमदारांचं मन जिंकलं.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही संधी दिली. सर्वांना भेटून खूप चांगलं वाटत आहे. जे मी काल बघितलं ते मी कधी विसरु शकत नाही. तसेच मी इथेसुद्धा आज बघतोय, इथलेदेखील क्षण मी कधी विसरु शकत नाही. थँक्यू सो मच. मी काय म्हणू? माझे शब्द संपले आहेत. मला माहिती नाही, मला काय बोलायचं, थँक्यू सो मच”, अशा शब्दांत सूर्यकुमार यादव याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
“इकडे येऊन खूप चांगले वाटले. आमचे बीसीसीआयचे ट्रेझर आशिष शेलार हे सुद्धा काल आम्हाला घ्यायला आले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जे काल बघितलं, आपल्या मुंबई पोलिसांनी जे काल केलंय, ते मला वाटत नाही की, कोणी असं करु शकतं. आम्हाला असंच प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करतो. नंतर परत आपण अजून एक वर्ल्ड कप जिंकू”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानेदेखील मराठीत भाषण केलं. “सर्वात आधी माझा सर्वांना नमस्कार. मुख्यमंत्री साहेब आम्हाला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल खूप धन्यवाद. सर्वांना बघून खूप वरं वाटलं. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की, असा कार्यक्रम कधी इथे झाला नाही. मला बघून खूप आनंद झाला की, असा कार्यक्रम आमच्यासाठी आयोजित केला”, असं रोहित शर्मा म्हणाला.
“वर्ल्ड कप भारतात आणायचं हे आमचं सर्वांचं स्वप्न होतं. आम्ही 11 वर्ष थांबलेलो. आम्ही 2013 मध्ये शेवटची चॅम्पियन ट्रॉफी जिंकलो होतो. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आभारी आहे. सर्व सहकाऱ्यांमुळे झालं. मी नशीबवानसुद्धा आहे, कारण मला जे खेळाडू संघात मिळाले ते सर्व चांगले खेळाडू होते. सगळ्यांनी जेव्हा संघात गरज होती तेव्हा परिस्तिथीनुरुप सर्वांनी आपलं महत्त्वाचं योगदान दिलं. सूर्याने आता सांगितलं की, त्याचा हातात बॉल बसला. बरं झालं तो बॉल बसला. नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं”, अशी मिश्किल टिप्पणी रोहित शर्माने केली.