“मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा माझा अजिबात विषय नाही. पण अडचण काय झाली, त्यांना जी सुपारी मिळाली होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिली सुपारी माझ्या नावाची होती. महायुतीने माझा धसका घेतलाय. राज ठाकरे माझं कधीही टार्गेट नव्हतं”, असं सुषमा अंधारे म्हणाले. “मी त्यांना मानतही नाही त्यांना माझ्यावर बोलले म्हणून माझा हिसका दाखवला. मी त्यांच्यावर बोलतही नाही. माझं टार्गेट हे इथले कळसूत्री बाहुल्या हलवणारे फडणवीस यांना टार्गेट आहे”, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.
यावेळी सुषमा अंधारे यांनी शालिनी ठाकरे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “या बाई कोण आहेत याची मला माहितीही नाही. मी बोलल्यानंतर जसा स्प्रे मारल्यावर किडे बाहेर येतात. तडफडतात तशी तडफड उडाली आहे. त्यांच्या अतृप्त आत्म्याला शांती मिळो, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
“शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यावर मी टीका केली नाही. मी त्यांना प्रश्न विचारले आहेत. त्यांच्यावर आरोप करणारे कोण होते? किरीट सोमय्या होते. यामिनी जाधव गुन्हेगार नसतील तर किरीट सोमय्या यांनी यामिनी जाधव यांची माफी मागावी. अथवा यामिनी जाधव यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा. आम्हाला मग कळेल, त्यानंतर आम्हाला कळेल काय खरं आणि काय खोटं ते?”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महायुतीवर निशाणा साधलाय. “मुंबईमध्ये आज दुःखाचा दिवस आहे. मुंबईमध्ये आज एक मोठं होर्डिंग कोसळलं. त्यात अनेक लोक हे मृत्युमुखी पडले आहेत. आपल्या देशातील निवडणुकीच औतसुक्य आहे. कारण या देशातील लोकशाही ही टिकली पाहिजे म्हणून सर्व देश आपल्याकडे पाहत आहेत. मोदी यांच्यावर टीका करतो म्हणून अरविंद केजरीवाल, संजय राऊत, अनिल देशमुख यांना तुम्ही तुरुंगात टाकलं. ही निवडणूक साधी सोपी नाही. काही चूक करायची नाही. नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला भोगावं लागेल. भाजप तडीपार हे तुम्ही बोलत आहात. त्यावर आता काम करावं लागेल आणि संजय दिना पाटील यांना निवडून द्यावं लागेल”, अशी टीका शरद पवार यांनी केली.