मुंबई: निलंबित सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांनी फेसबुक पोस्टवरून संताप व्यव्त केला आहे. खोटे गुन्हे नोंद करणारे तुम्ही, अत्याचार करणारे तुम्ही, मग आम्हाला गोळ्याही तुम्हीच घाला, असा संताप सुजाता पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सुजाता पाटील यांनी फेसबुकवरून पोस्ट करत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली आहे. खोटे गुन्हे नोंद करणारे तुम्ही, अत्याचार करणारे तुम्ही, बरबाद करणारे तुम्ही, मग आम्हाला गोळ्या सुद्धा तुम्हीच घाला. न्याय व्यवस्थेपर्यंत जाण्याची गरज नाही. गर्व आहे मला तुमच्यावर, असा संताप पाटील यांनी व्यक्त केला आहे.
FB वरील मित्र-मैत्रिणी विचारत आहेत तुमच्यावर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तुम्ही का नाही काढला? मी, माझा नवरा, मुलगा, मुलगी आम्हा सर्वांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले होते. अँटी-करप्शनचा गुन्हा नोंद झाल्यानंतर त्या घरातील आया-बहिणी, मुलींना हात लावण्याचा, अश्लील बोलण्याचा विनयभंग करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना प्राप्त होतो, हे माहीत नव्हते. 15 ते 16 तास माझ्या तरुण मुलीला अश्लील शब्दप्रयोग वापरून, तिचा वारंवार विनयभंग करून आई-वडील भाऊ व तिला अटक करण्याची भीती घालणाऱ्या बेशरम अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक, अत्याचार करून आमची छळवणूक करण्यापेक्षा माझी मुलं, पती, मी सर्वांना महाराष्ट्र पोलिसांनी जिवंत जाळावे. तक्रार करण्यास कोणीच मागे रहाणार नाही. माझा, मुलीचा विनयभंग, माझ्या सेवानिवृत्त पती व वर्ल्ड बुक ऑफ गिनिज आणि लिम्का वर्ल्ड बुक मध्ये नोंद असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडूच्या मुलावर केलेले अत्याचार संतापजनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आम्हाला न्याय द्या, अशी विनवणीही त्यांनी केली आहे.
मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त
याआधी हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षकपदाचीही जबाबदारी
हिंगोलीत बदली न झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र
आत्महत्या किंवा राजीनामा हे दोनच पर्याय असल्याची खंत
दरम्यान, पाटील यांच्या एका पत्रानेही पूर्वी खळबळ उडाली होती. बदली करताना माझा विचारच करण्यात आला नाही, त्यातच मी कर्जबाजारी झाले असून माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्या करणे किंवा राजीनामा देणे, हेच पर्याय असल्याचे पत्र हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षकपदी असताना सुजाता पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पाठवली होती. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.
संबंधित बातम्या:
शंभर दीडशे नाही, पावणे दोनशे कोटी सापडले, नोटा मोजायलाही 13 मशिन्स, कानपूरच्या रेडमध्ये नवं ‘शिखर’!