‘आम्ही तुमच्यासोबत आहोत, काळजी करू नका’, मुख्यमंत्र्यांकडून लोणकर कुटुंबियांचं सांत्वन

| Updated on: Jul 16, 2021 | 7:18 PM

स्वप्नीलच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका,’ अशा शब्दांत स्वप्नीलच्या कुटुबियांना धीर दिला.

‘आम्ही तुमच्यासोबत आहोत, काळजी करू नका, मुख्यमंत्र्यांकडून लोणकर कुटुंबियांचं सांत्वन
‘आम्ही तुमच्यासोबत आहोत, काळजी करू नका', मुख्यमंत्र्यांकडून लोणकर कुटुंबियांचं सांत्वन
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर स्वप्नीलच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका,’ अशा शब्दांत स्वप्नीलच्या कुटुबियांना धीर दिला. स्वप्नील लोणकरचे आई, वडील आणि बहिण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलची बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल. यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वनीलच्या आई छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला. यावेळी सह्याद्री अतिथीगृहावर विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री-लोणकर कुटुंबियांच्या भेटीवर भाजपची टीका

दरम्यान, लोणकर कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “अरेरे, दुर्दैवी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अखेर मुख्यमंत्र्याना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले तसे स्वप्नीलच्या घरी जाता आले नसते का? हे तर निबर कातडीचे सरकार, संवेदना हरवलेले सरकार”, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी टीका केली.

स्वप्नीलने टोकाचं पाऊल का उचललं?

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

स्वप्नीलने सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं होतं?

पासआऊट होऊन दोन वर्ष झाली आहेत. 24 वय संपत आलं आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे काहीच उरलेलं नाही. यास कोणत्याही व्यक्ती कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे.

‘सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नीलची आत्महत्या’

“सध्या महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडे मोडलं आहे. अशा परिस्थितीत आपली कमावती मुलं हा घरच्यांसाठी आधार असतो. पण अशा काळात जर सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्ती मुली सोडून गेली तर कुटुंबीयांनी काय करायचं? आम्ही तर म्हणू की सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केलीय”, असा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलाय.

संबंधित बातमी :

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेची 10 लाखाची मदत, स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठीही मदत करणार- एकनाथ शिंदे