मुंबईः ही सहानुभूती नाही. तर वास्तवावर घट्ट प्रश्नचिन्हं आहे. गरज दोघांची आहे. सोयीसाठी, सुविधेसाठी आपण खाद्यपदार्थांची (Food Products) होम डिलिव्हरी (Home delivery) घेतो. पण दारात अशी व्यक्ती सेवा देण्यासाठी उभी राहते, जिला स्वतःच्या पायांवर उभे राहता येत नाही. आतापर्यंत भूकेने पोटात कावळे ओरडत असतात. पण इथं पोटाची खळगी भरण्यासाठी ही व्यक्ती आपल्या सेवेत उभी राहिलेली पाहून मन स्तब्ध होतं. आपल्याच पोटात गोळा येतो. मान शरमेनं झुकते. काहीतरी मोठी चूक केल्यासारखं वाटतं. स्विगी कंपनीच्या होम डिलिव्हरी करणाऱ्या दिव्यांग (Differently abled ) महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ट्विटरवर काही दिव्यांग डिलिव्हरी बॉयजचे फोटोही सध्या वेगाने शेअर केले जातायत.
चूक तुमची नाही. तिचीही नाही. नियतीनं घात केला असेल. हे लोक झुकले नाहीत. उभे राहिले. काळ बदलतोय. तसं त्यांनी नवं क्षेत्र निवडलं. पायावर घाव झाले असतील. पण जगण्याची नवी चाकं मदतीला घेतली.
सध्या या दिव्यांग डिलिव्हरी बॉय आणि गर्ल्सचे फोटो व्हायरल होत आहेत. नेटकरी कौतुकही करतायत.
विशेष म्हणजे स्विगी कंपनीचं जास्त कौतुक केलं जातंय. त्यांनी अशा Real Heros ना संधी दिली. कंपनीने अशा व्यक्तींना सेवेची संधी दिल्यानं ही अभिमानाची बाब मानली जातेय.
खरं तर वेगाने घरपोच खाद्यपदार्थ देण्याचं हे काम. पण कंपनीनं दिव्यांगांच्या वेगावर विश्वास ठेवत, प्रतिकुलतेवरही मात करण्याची दिलेली संधी जास्त कौतुकास्पद.
या दिव्यांगांकडून तुम्हाला खाद्यपदार्थ पोहोचवेपर्यंत पाचेक मिनिटं उशीर होईलही. पण पार्सल घेण्यासाठी दारात जाल तेव्हा अशा व्यक्तीला सलाम केल्याशिवाय राहणार नाहीत.