मुंबईत टीम इंडियाची जंगी Victory Parade, तुम्हालाही होता येईल सहभागी, वाचा A टू Z माहिती

| Updated on: Jul 04, 2024 | 1:11 PM

मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच या परेडचे साक्षीदार होणाऱ्या नागरिकांसाठीही काही महत्त्वाच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

मुंबईत टीम इंडियाची जंगी Victory Parade, तुम्हालाही होता येईल सहभागी, वाचा A टू Z माहिती
Follow us on

Team India Mumbai Grand Victory Parade : टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे. यानंतर आता लवकरच टीम इंडिया दिल्लीहून मुंबईत दाखल होणार आहे. भारतीय संघ मुंबईत दाखल झाल्यावर नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच या परेडचे साक्षीदार होणाऱ्या नागरिकांसाठीही काही महत्त्वाच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मुंबई पोलीस दलाचे डीसीपी प्रवीण मुंडे यांनी मुंबईत परेडचे साक्षीदार होणाऱ्या नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी त्यांनी ही विजयी मिरवणूक किती वाजता सुरु होईल, ती कुठून कुठपर्यंत असणार याचीही सर्व माहिती दिली आहे.

4.30 पूर्वी मरीन ड्राईव्हवर हजर राहण्याचे आवाहन

“मुंबई पोलिस दलाच्या वतीने होणाऱ्या विजयी यात्रेच्या संदर्भाने काही सूचना आपणास देऊ इच्छितो. भारतीय क्रिकेट संघ हा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह नरीमन पाईंट ते वानखेडे स्टेडिअम यादरम्यान विजयी यात्रा करण्यात येणार आहे. जर तुम्हाला सहभागी होण्यासाठी किंवा पाहण्यासाठी येणार असाल तर ४.३० पूर्वी मरीन ड्राईव्हच्या चौपाटीवर हजर राहावं. रोडवर कोणीही येऊ नये. तसेच क्रॉसिंग करतानाही काळजी घ्या, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

तसेच सुमारे ७ वाजता वानखेडे स्टेडिअमवर विजयी फेरी होणार आहे. बाहेर ओपन बसमधून विजयी यात्रा पाहणाऱ्या चौपाटीवरील नागरिकांना आत स्टेडिअममध्ये एकत्र जाणे कठीण होईल. त्यामुळे ज्यांना स्टेडिअममध्ये जाऊन विजयी फेरी पाहायची असेल त्यांनी वेळेपूर्वी म्हणजे ६ पर्यंत वानखेडे स्टेडिअममध्ये जावं. यासाठी गेट क्रमांक ४ आणि ५ A चा वापर करावा. त्याचप्रमाणे नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर टाळावा. तसेच पोलिसांनी सुरक्षेच्या कारणात्सव जे नियोजन केले आहे, त्या सूचनांचे पालन करावं”, अशाही सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत.

वाहतूक व्यवस्थेत बदल

तसेच मुंबई पोलिसांनी ट्वीट करत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याचीही माहिती दिली आहे. मरीन ड्राईव्ह येथे “टी-२० विश्वचषक २०२४ विजेते” भारतीय क्रिकेट संघाची शोभायात्रा आयोजित करण्यात येत आहे. त्याकरीता सदर ठिकाणी लोकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने वाहतूकीची कोंडी टाळण्याकरिता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत, असे ट्वीट मुंबई ट्राफिक पोलिसांनी केले आहे. त्यांनी यात कोणकोणते रस्ते बंद असणार याचीही माहिती दिली आहे.