राज ठाकरे यांनी वरळी व्हिजन या कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्रात वाढत असलेल्या लोंढ्यांबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र उभा करण्यासाठी १० वर्षाचा विचार नसतो करायचा. २०० ते ५०० वर्षाचा विचार करायचा असतो. दहा वर्षात काही होत नसतं. दहा वर्षात वाट लागते. आधीची मुंबई पाहिली असेल. त्या मुंबईला एक कॅरेक्टर होतं. लाल बस, काळीपिवळी टॅक्सी दिसली की ती मुंबई वाटायची. लंडनला लंडन टॅक्सी आहे. न्यूयॉर्कला बस आहे. प्रत्येक शहराला कॅरेक्टर असतं. या शहराची ओळख काय. काहीच नाही. आपल्याकडे पूल होत आहे. माझा विकासाला विरोध नाही. पण हे सर्व कुणासाठी का होतंय.
‘एवढ्याश्या जागेत किती माणसं राहू शकतात याला काही मर्यादा आहे की नाही. मुंबईतील लोक येतात त्यांची संख्या किती. बाहेरून लोक येतात, त्यामुळे त्यांना सुविधा पाहिजे. त्यासाठी रस्ते, पूल आणि सर्व गोष्टी वाढवली जात आहे. आमचा सर्व पैसा या सुविधांवर खर्च होत आहे. महाराष्ट्रासाठी खर्च होत नाही. शेतकरी आत्महत्या होत आहे. हा पैसा मूळ सुविधेवर खर्च न होता, या सर्व गोष्टीवर खर्च होत आहे.’
‘ठाणे जिल्हा जगाच्या पाठिवर असा जिल्हा मिळणार नाही. या देशात तर नाहीच नाही. पंचायत ते महापालिका या स्टेप्स लोकसंख्येवर ठरतात. आज मुंबई शहरात एक महापालिका आहे. पुणे जिल्ह्यात दोन महापालिका आहेत. सर्व जिल्ह्यातील महापालिका पाहिल्या तर एक किंवा दोन आहेत. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे, तिथे आठ महापालिका आहेत. (लोकांनी टाळ्या वाजवल्या, ठाकरे म्हणाले, तीच टाळी गालावर वाजवून घेऊ) बाहेरच्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात येते. त्यानंतर ते मुंबई आणि पुण्यात जातात. कुठून आणणार सुविधा. यावर खर्च होतात. इथला माणूस सुखी झाल्यावर बाहेरचे लोक आले तर समजून घेईल. पण इथला माणूस बेघर होतोय आणि बाहेरच्यांना कडेवर घ्यायचं तर कसं व्हायचं.’