मुंबई : इतर मागास वर्गाची अर्थात ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केली आहे. मुंबईतील वडाळा येथे मराठा समाजाच्या मंथन बैठकीत बाळासाहेब सराटेंनी ही मागणी केली. या बैठकीला इतिहासतज्ञ चंद्रकांत पाटील, राजन घाग यांच्यासह मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते.
“राज्य मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिला, त्यावरुन मराठा समाज आरक्षणाला पात्र झाला. आता सरकारने निर्णय घ्यावा. कुठल्याही समाजाने मराठा समजाच्या विरोधात उभे राहणं गैर आहे. सरकारची ही जबाबदारी आहे की, या समाजाला आरक्षण द्यायचे.” असे मत बाळासाहेब सराटे यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब सराटेंचा इशारा
“आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. दोन कोटींचा समाज रस्त्यावर येतो. आम्ही कुणाच्याही विरोधात भूमिका घेतलेली नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. हा समाज नागरिकांचा समूह आहे. आपण आता प्रगतीच्या दिशेने हातपाय हलवू, जे कुणी विरोध करत आहेत, त्यांना एवढेच सांगतो, तुम्ही तुमच्या समाजाचा घात करता आहात.”, असा इशारा बाळासाहेब सराटे यांनी दिला. तसेच, ओबीसी आणि मराठा विरोधक नाहीत, मराठा समाज कुणाच्याही विरोधात नाही, असेही सराटेंनी नमूद केले.
“एका ओळीच्या जीआरने माळी ओबीसीत”
“1967 साली पहिलं आरक्षण लागू झालं. कोणताही अहवाल नव्हता. काहीही नव्हतं. तरी 180 जाती ओबीसीमध्ये समाविष्ट केल्या. एका ओळीच्या जीआरने माळी समाज ओबीसीमध्ये गेला आणि नंतर इतर जाती ओबीसीमध्ये गेल्या. पण मराठ्यांचं नाव आलं की यांचं पित्त खवळतं. आजपर्यंत यांनी 50 वर्षे आरक्षणावर डल्ला मारला. यांना घटनेने कोणताही अधिकार नाही. तरीही मराठा समाजाला का चिडवताय?” असेही बाळासाहेब सराटे यावेळी म्हणाले.