मुंबई: जुईनगर स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी ते पनवेल दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने पहाटे पहाटेच चाकरमान्यांना त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, रेल्वेकडून हार्बरवरील वाहतूकसेवा पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर ही वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, रेल्वेचं वेळापत्रक अजूनही कोलमडलेलेचं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आज पहाटे पहाटे साडे सहाच्या दरम्यान जुईनगर स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक वाशी ते पनवेल दरम्यान थांबली. गेल्या 20 मिनिटांपासून रेल्वे वाहतूक बंद आहे. वाहतूक कोणत्या कारणाने बंद झाली, वाहतूक कधी सुरू होणार याबाबतची कोणतीही माहिती रेल्वेकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत.
20 मिनिटांपासून लोकल एकाच जागी थांबून आहे. रेल्वेकडून कोणतीही सूचना देण्यात येत नाही. त्यामुळे लोकल कधी सुरू होणार याची काहीच माहिती मिळत नसल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संतापाचा पारा चढला आहे.
गेल्या वीस मिनिटांपासून रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने वाशी ते पनवेल दरम्यानच्या स्थानकांवर तुफान गर्दी झाली आहे. तसेच मानखुर्द ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे.
वाहतूक सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने काही चाकरमान्यांनी ट्रान्स हार्बरने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. तर काही चाकरमानी बसच्या दिशेने धावताना दिसत आहेत. तर अनेकजण लोकल सुरू होण्याची वाट पाहत असल्याने त्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.
दरम्यान, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम रेल्वे सुरू केले असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, ही बिघाड कधी दुरुस्त होणार याची माहित देण्यात आलेली नाही.