धारावीत ‘मशिदी’वरुन तणाव, नितेश राणे यांची टीका

| Updated on: Sep 21, 2024 | 11:03 PM

मुंबईतल्या धारावीतील मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेची गाडी गेली. मात्र जमावानं गाडी फोडली. त्यावरुन आता राजकीय वातावरण तापलं आहे.

धारावीत मशिदीवरुन तणाव, नितेश राणे यांची टीका
Follow us on

मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी महापालिकेचं पथक मुंबईच्या धारावीत पोहोचलं आणि तणाव निर्माण झाला. जमावानं महापालिकेची गाडीही फोडली. पाहता पाहता, मुस्लीम समाजाचा मोठा जमाव सुभानी मशिद परिसरात जमला. अखेर सुभानी मशिदीच्या ट्रस्टींनी 4-5 दिवसांत आम्हीच अनधिकृत बांधकाम तोडण्याचं लेखी आश्वासन दिलं आणि महापालिका प्रशासनानं विनंती मान्य केली. त्यानंतर महापालिकेच्या गाड्या आणि कर्मचारी माघारी परतले.

गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, मशिदीच्या ट्रस्टींनी लेखी दिल्याप्रमाणं ते 5-6 दिवसांत स्वत:हून बांधकाम तोडतील. मात्र स्थानिकांनी आता बुल्डोजर राज नहीं चलेगा म्हणत स्थगितीसाठी कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे. तर ज्या, पद्धतीनं महापालिकेची गाडी फोडण्यात आली…आणि अनधिकृत बांधकाम तोडण्यापासून रोखण्यात आलं, त्यावरुन नितेश राणेंनी टीका केली आहे.

ज्या धारावीत ही सुभानी मशीद आहे. त्या धारावीचा पुनर्विकास अदानी समुहाकडून होतो आहे. त्यामुळं धारावीच रिडेव्हलपेंटमध्ये गेल्यानं महापालिकेला कारवाईचा अधिकार नाही, असं काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचं म्हणणं आहे. तर महापालिका कारवाईसाठी येणार असल्यानं एक दिवसआधीच जमाव गोळा करण्यासाठी एक पत्र व्हायरल करण्यात आलं असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवण्याचं लिखीत दिल्यानं, महापालिकेनं कारवाई मागे घेतली. त्यामुळं पुढं काय होतं हे पुढच्या 6 दिवसांत दिसेल.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘धारावीतील ९० फूट रोडवर असलेल्या मेहबूब-ए-सुभानी मशिदीचा कथित बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी जी-उत्तर प्रशासकीय प्रभागातील बीएमसी अधिकाऱ्यांचे पथक सकाळी ९ वाजता पोहोचले. काही वेळातच, मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी मशीद असलेल्या रस्त्यावर जाण्यापासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रोखले.’ या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नंतर शेकडो लोक धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेरही जमले आणि महापालिकेच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर बसले.’