मुंबई | 10 डिसेंबर 2023 : महाराष्ट्रातील एका गावास सिरीया बनवण्याची पूर्ण तयारी अतिरेक्यांनी केली होती. भारतात इस्लामी जिहादला अनुसरून घातपाती कारवाया करुन अराजकता निर्माण करण्याचा उद्देश दहशतवाद्यांनी ठेवला होता. ISIS च्या सिरीयाप्रमाणे या गावातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी काम सुरु केले होते. सर्व दहशतवादी या गावात एकत्र येऊ लागले होते. सर्व राज्यात स्थानिक सेलची निर्मिती करुन दहशतवादी कारवाया करण्यात येणार होत्या. यासाठी ठाणे जिल्ह्यातील पडघा गावाची निवड या लोकांनी केली होती. या अतिरेक्यांनी या गावाला परस्पर “स्वतंत्र” जाहीर केले. गावाचे नामांतर करुन “अल् शाम” ठेवले. मग देशभरातून जिहादी युवकांना या गावात आणून दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याची घातक योजना सुरू होती. NIA च्या तपासातून ही माहिती उघड झाला आहे. या सर्व प्रकारामुळे अधिकारी चक्रावले आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एकाच वेळी छापे मारले. त्या छाप्यात अतिरेक्यांचा भयंकर कट उघड झाला. भिवंडीमधील पडघा गावात १५ जणांना अटक करण्यात आली. त्यात घाटकोपर बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साकिब नाचण याचाही समावेश आहे. तसेच त्याचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकीब नाचण यांच्याही मुसक्या बांधल्या. साकिब नाचण हा 2002 आणि 2003 मधील मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी आहे. त्याला दहा वर्षे शिक्षा झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा सक्रीय झाल्याची माहिती एनआयएला मिळाली होती.
अतिरेक्यांनी मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी जाऊन रेकी केली होती. या लोकांना विदेशातून पैसा मिळत होता. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला करण्याची त्यांची योजना होती. त्यांना ड्रोन हल्ला करण्याचे प्रशिक्षणही दिले जात होते. साकिब नाचन संघटनेत सहभागी होणाऱ्यांना ‘बायथ’ म्हणजे आयएसआयएससाठी निष्ठा ठेवण्याची शपथ देत होता. एनआयएच्या कारवाईनंतर इसिसच्या टेरर मॉड्यूलचा भांडाफोड झाला आहे. एनआयए केलेल्या या कारवाईमुळे महाराष्ट्रातील आयसीस मॉड्यूल पुन्हा एकदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.